अपघात की कट? लग्नानंतर १४ व्या दिवशीच नववधूसोबत आक्रित घडलं; नवरा संशयाच्या भोवऱ्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 10:14 IST2026-05-14T10:13:13+5:302026-05-14T10:14:22+5:30
Priyanka Mishra Death Case: गोरखपूरची रहिवासी असलेल्या ३० वर्षीय प्रियंका मिश्राचा लग्नानंतर अवघ्या १४ व्या दिवशी झाशी येथील मिशन कंपाउंडमधील सासरच्या घरी संशयास्पद मृत्यू झाला.

फोटो - आजतक
Priyanka Mishra Death Case: गोरखपूरची रहिवासी असलेल्या ३० वर्षीय प्रियंका मिश्राचा लग्नानंतर अवघ्या १४ व्या दिवशी झाशी येथील मिशन कंपाउंडमधील सासरच्या घरी संशयास्पद मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास प्रियंका दुसऱ्या मजल्यावरून खाली पडली, त्यानंतर रुग्णालयात उपचारादरम्यान तिने अखेरचा श्वास घेतला. पती शुभमचा दावा आहे की, प्रियंका गच्चीच्या कठड्यावर बसली होती आणि मजा मस्करी करत असताना तोल गेल्याने ती खाली पडली. मात्र प्रियंकाच्या माहेरच्यांनी हा एक सुनियोजित कट आणि हुंड्यासाठी केलेली हत्या असल्याचं म्हटलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रियंका आणि शुभमचं लग्न एका मॅट्रिमोनिअल वेबसाईटच्या माध्यमातून ठरलं होतं. सुमारे दीड वर्षांपूर्वी झालेल्या या ओळखीनंतर दोन्ही कुटुंबांच्या संमतीने २८ एप्रिल रोजी थाटामाटात लग्न पार पडलं. प्रियंका उच्चशिक्षित होती, तिने इंग्रजी विषयात 'डबल एमए' आणि 'बीएड' केलं होतं, तर शुभमने 'बीएएमएस'चं शिक्षण पूर्ण केलं होतं. लग्नानंतर २ मे रोजी रिसेप्शन झालं आणि घरात आनंदाचे वातावरण होते. मात्र, सोमवारी एका कार्यक्रमादरम्यान ही भयंकर घटना घडली.
लग्नानंतर १४ व्या दिवशी नववधूचा मृत्यू; नवरा म्हणतो, "माझ्याशी मजा-मस्करी करत होती, अन्..."
पतीच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह
घटनेच्या वेळी पती शुभम हा प्रियंकासोबत गच्चीवर उपस्थित होता. शुभमचं म्हणणं आहे की, ते दोघे गप्पा मारत होते आणि प्रियांका गमतीने गच्चीच्या कठड्यावर बसली होती. वारंवार मनाई करूनही तिने ऐकलं नाही आणि तिचा तोल गेला. मात्र, इतक्या कडक उन्हात ते दोघे गच्चीवर का गेले होते? याचं उत्तर शुभम देऊ शकला नाही. हा केवळ अपघात होता की दोघांमध्ये काही वाद झाला होता, याचा तपास आता पोलीस करत आहेत.
माहेरच्यांचा हुंडाबळीचा आरोप
प्रियंकाच्या मृत्यूची बातमी समजताच गोरखपूरहून आलेल्या तिच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. प्रियंकाचा भाऊ रत्नेश याने आरोप केला आहे की, लग्नानंतर सासरचे लोक सोन्याचे दागिने, १० लाख रुपये रोख आणि कारची मागणी करत होते. ही मागणी पूर्ण न झाल्याने प्रियंकाचा छळ केला जात होता. कुटुंबीयांच्या मते, प्रियंका अत्यंत समजूतदार होती आणि ती अशा प्रकारची धोकादायक कृती कधीच करू शकत नाही. तिला मुद्दाम गच्चीवर नेऊन ढकलून देण्यात आलं असावं असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.
शेवटचा फोन आणि पोलीस कारवाई
घटनेच्या अवघ्या २० मिनिटांपूर्वी प्रियंकाने आपल्या आईला फोन केला होता, मात्र तिचं बोलणं होऊ शकलं नाही. तिला काहीतरी महत्त्वाची गोष्ट सांगायची होती असं तिच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे. एसपी सिटी प्रीती सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, माहेरच्यांच्या तक्रारीवरून पती, सासू आणि सासऱ्यांविरुद्ध एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला असून त्यांना ताब्यात घेतलं आहे. पोलीस घरातील सीसीटीव्ही कॅमेरे आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टच्या आधारे मृत्यूचे नेमकं कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.