Mhada Lottery 2026: म्हाडा घरांच्या लॉटरीला दुसऱ्यांदा मुदतवाढ; आता कोणत्या तारखेपर्यंत अर्ज करता येणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 06:30 IST2026-05-14T06:29:39+5:302026-05-14T06:30:56+5:30
Mhada Lottery 2026 Mumbai Last Date: अधिकाधिक संख्येने अर्ज यावे याकरिता म्हाडावर २ हजार ६४० घरांच्या लॉटरीला दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्याची नामुष्की म्हाडावर ओढावली आहे.

Mhada Lottery 2026: म्हाडा घरांच्या लॉटरीला दुसऱ्यांदा मुदतवाढ; आता कोणत्या तारखेपर्यंत अर्ज करता येणार?
मुंबई : म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांसाठी कमी संख्येने अर्ज आले असून, घरांच्या किमतीही अव्वाच्या सव्वा आहेत. परिणामी अधिकाधिक संख्येने अर्ज यावे याकरिता म्हाडावर २ हजार ६४० घरांच्या लॉटरीला दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्याची नामुष्की ओढावली. आता या मुदतवाढीनुसार, २८ मे पर्यंत ऑनलाईन नोंदणी व अर्ज करता येईल, तर कन्नमवार नगर-विक्रोळी (पूर्व) प्रकल्पातील १,२२१ सदनिकांपैकी ६१० सदनिका केवळ उच्च उत्पन्न गटासाठी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
कन्नमवार नगर-विक्रोळी (पूर्व) प्रकल्पातील संकेत क्रमांक ५३८ व ५३९ मधील १२२१ सदनिकांच्या विक्री किमतीत ७.५ टक्के कपात करण्यात आली. १२२१ सदनिकांपैकी ६१० सदनिका सोडतीत संकेत क्रमांक ५३८-अ व संकेत क्रमांक ५३९-अ या नवीन संकेत क्रमांकान्वये केवळ उच्च उत्पन्न गटासाठी आहेत.

हा बदल १४ मे पासून करण्यात येणार आहे. संकेत क्रमांक ५३८ व संकेत क्रमांक ५३९ मधील सदनिकांच्या विक्री किमतीत ७.५ टक्के कपातीचा यापूर्वी घेतलेला निर्णय संकेत क्रमांक ५३८-अ व संकेत क्रमांक ५३९-अ मधील उच्च उत्पन्न गटातील सदनिकांसाठीही लागू असणार आहे. या प्रकल्पातील सदनिका धारकांना प्रत्येकी एक वाहनतळ (पार्किंग) विनामूल्य आहे.