CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 18:25 IST2025-10-09T18:18:01+5:302025-10-09T18:25:08+5:30
NCP SP Group Nilesh Lanke CJI BR Gavai News: सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा देशभरातून निषेध व्यक्त केला जात असतानाच शरद पवारांचे खासदार निलेश लंके यांनी दिल्लीला जात त्या वकिलांना गाठले.

CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
NCP SP Group Nilesh Lanke CJI BR Gavai News: सोमवारी सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज सुरू असताना अचानक सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रकार घडला. एका याचिकेवर सुनावणी सुरू होती. त्यात मधेच एका वकिलाने सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने बूट फेकला. यानंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर तत्काळ पोलिसांनी त्या वकिलाला ताब्यात घेतले. या वकिलाचे नाव राकेश किशोर असून, या कृत्याबाबत आपल्याला खंत नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. यानंतर संपूर्ण देशभरात या घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला. यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी दिल्लीला जाऊन त्या वकिलाला गाठल्याची माहिती समोर आली आहे.
भर कोर्टात बूट फेकण्याचा प्रयत्न, CJI भूषण गवई यांच्या आईची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
भर न्यायालयात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या या हल्ल्याचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त करण्यात आला. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार यांच्यासह अनेकांनी याचा तीव्र शब्दांत निषेध केला. महाराष्ट्रात विरोधी पक्षांकडून निषेध आंदोलने करण्यात आली. राकेश किशोर यांच्याविरुद्ध बंगळुरूमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच राकेश किशोर यांचे सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन आणि बार कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्यत्वही रद्द करण्यात आले आहे.
निलेश लंके दिल्लीत गेले आणि त्या वकिलांना गाठले
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी वकील राकेश किशोर यांची दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी निलेश लंके यांनी वकील राकेश किशोर यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आणि संविधानाची प्रत भेट म्हणून देण्याचा प्रयत्न केला. निलेश लंके यांनी याबाबत पत्रकारांना माहिती दिली.
राकेश किशोर यांची भेट का घेतली? निलेश लंके म्हणाले...
राकेश किशोर यांच्याकडून घडलेली घटना संकुचित आणि मनुवादी विचारांमधून घडलेली घटना आहे. संविधानाचा त्यांना कुठेतरी त्यांना विसर पडला आहे. त्याची त्यांना पुन्हा जाणीव करून देण्यासाठी इथे आलो आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाचे संविधान निर्माण केले. संविधानाचे संरक्षण करण्याची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाची आहे. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याबाबत जो प्रकार घडला, तो एका व्यक्तीचा अवमान नसून संपूर्ण देशाचा अवमान होता. जे कृत्य घडले, त्याचा शांततेच्या मार्गाने निषेध करण्यासाठी आंबेडकरांचा फोटो आणि संविधानाची प्रत घेऊन येथे आलो, अशी माहिती खासदार निलेश लंकेंनी दिली.
घटनेच्या तीन दिवसांनंतर सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले...
एका याचिकेवर सुनावणी सुरू असताना सरन्यायाधीश भूषण गवई यांनी पुन्हा एकदा या घटनेवर भाष्य केले. सोमवारी जे घडले, त्याने आम्ही सगळेच काही काळ स्तब्ध झालो होतो. मात्र आता तो आमच्यासाठी एक संपलेला धडा आहे. बूटफेकीच्या प्रकारानंतर सरन्यायाधीश हे अविचल होते. त्यांनी कामकाजही थांबवले नाही. अशा घटनेने कोणीही विचलित होऊ नये, आम्हीही झालेलो नाही. अशा घटनांचा माझ्यावर काही परिणाम होत नाही, अशी प्रतिक्रिया सरन्यायाधीश भूषण गवई यांनी दिली होती. सरन्यायाधीश गवई यांनी वकिलाविरुद्ध कोणतीही तक्रार दाखल केली नाही. उलट, अधिकाऱ्यांना इशारा देत त्यांना जाऊ देण्यास सांगितले.
दरम्यान, एका धार्मिक प्रकरणाच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या वक्तव्याने मी दुखावलो गेलो. त्यामुळे मी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूटफेकीचा प्रयत्न केला. मला माझ्या कृत्याबद्दल कोणताही पश्चाताप नाही. सरन्यायाधीश हे उच्च संवैधानिक पद आहे. तिथे स्थानापन्न होणाऱ्या व्यक्तीला मायलॉर्ड म्हटले जाते. त्या शब्दाचा अर्थ नीट समजून घेणे व त्या पदाची प्रतिष्ठा जपणे अपेक्षित आहे. त्यांच्या काही उद्गारांनी मी खूप दुखावलो गेलो व त्यामुळे माझ्या हातून कृती घडली. सरन्यायाधीशांच्या दालनात विशिष्ट कृती करताना मी मद्य किंवा कोणतेही औषध प्राशन केलेले नव्हते. मी काय करतो आहे याची मला जाणीव होती. सरन्यायाधीशांनी एका खटल्यात केलेल्या वक्तव्यावर ती माझी प्रतिक्रिया होती. त्याचा मला पश्चाताप होत नाही किंवा मी घाबरलेलोही नाही. आजवर मी साधे सरळ आयुष्य जगत आलो आहे. माझ्यावर कोणताही खटला नाही तसेच हिंसेला माझा विरोध आहे. मला एका दैवी शक्तीने असे करण्यास सांगितले होते. मी जेव्हा कृती केली, तेव्हा असा विचार करून गेलो होतो की माझ्यासोबत जे घडायचे आहे ते घडू दे, देवाची इच्छा असेल ते माझ्यासोबत होईल, मी काहीही करू शकत नाही. पण मला सोडून देण्यात आले. मलाही समजत नाही की हा सरन्यायाधीशांचा दयाळूपणा आहे, त्यांचा चांगुलपणा आहे की यामागे काही वेगळेच रहस्य आहे, अशी प्रतिक्रिया ७१ वर्षीय राकेश किशोर यांनी या घटनेनंतर दिली.