LPG घेऊन आज पहिला टँकर 'शिवालिक', उद्या 'नंदादेवी' येणार! ९२,७०० टन गॅस किती दिवस पुरणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 11:47 IST2026-03-16T11:46:54+5:302026-03-16T11:47:57+5:30
LPG Supply Calculation: 'शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया'ची दोन मोठी एलपीजी वाहक टँकर जहाजे— 'शिवालिक' आणि 'नंदादेवी'— इराणच्या किनारपट्टीवरील धोकादायक 'होर्मुझची सामुद्रधुनी' यशस्वीरित्या ओलांडून भारताच्या वेशीवर आली आहेत.

LPG घेऊन आज पहिला टँकर 'शिवालिक', उद्या 'नंदादेवी' येणार! ९२,७०० टन गॅस किती दिवस पुरणार?
पश्चिम आशियातील युद्धामुळे भारताच्या ऊर्जा सुरक्षेवर निर्माण झालेले संकट काही अंशी कमी झाले आहे. 'शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया'ची दोन मोठी एलपीजी वाहक टँकर जहाजे— 'शिवालिक' आणि 'नंदादेवी'— इराणच्या किनारपट्टीवरील धोकादायक 'होर्मुझची सामुद्रधुनी' यशस्वीरित्या ओलांडून भारताच्या वेशीवर आली आहेत. आज शिवालिक भारतीय बंदरावर पोहोचणार असून उद्या नंदादेवी टँकर पोहोचणार आहे. हा गॅस भारताला किती दिवस पुरणार असा सवाल उपस्थित होत आहे.
या दोन जहाजांवर मिळून सुमारे ९२,७०० मेट्रिक टन एलपीजी गॅस आहे. प्रत्येक जहाजावर ४६,००० टनांहून अधिक गॅस असून, तो देशाच्या घरगुती आणि व्यावसायिक वापरासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. शिवालिक हे जहाज १६ मार्च २०२६ रोजी (आज) गुजरातच्या मुंद्रा बंदरात पोहोचण्याची शक्यता आहे. नंदादेवी हे जहाज १७ मार्च २०२६ रोजी कांडला बंदरात दाखल होईल.
किती दिवसांची गरज पूर्ण होणार?
भारताच्या एकूण गॅस आयातीपैकी ९०% आयात होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होते. तज्ज्ञांच्या मते, भारतामध्ये दररोज सुमारे ८०,००० टन एलपीजीचा वापर होतो. दररोज सुमारे ७५ लाख सिलेंडर वापरले जातात. एकूण गॅसपैकी ८५% सिलेंडर स्वयंपाकासाठी (घरगुती) वापरले जातात. भारतात ३३ कोटी एलपीजी ग्राहक आहेत. या ९२,७०० टन गॅसमुळे देशातील सुमारे सव्वा दिवसाची अतिरिक्त गरज पूर्ण होऊ शकते. युद्धाच्या काळात जेव्हा पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे, तेव्हा हा सव्वा दिवसाचा साठाही भारतीय स्वयंपाकघरांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे.
शिवालिक' आणि 'नंदादेवी' ही दोन जहाजे सुरक्षित बाहेर पडल्यानंतर, आता होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या पश्चिमेला अडकलेले ६ एलपीजी आणि १ एलएनजी टँकर भारतात आणण्यासाठी हालचाली वेगवान झाल्या आहेत. होर्मुझच्या पाण्यावर सध्या भारताची २२ जहाजे उभी असून त्यावर ६११ भारतीय खलाशी आहेत. भारत प्रामुख्याने कतार, कुवेत आणि सौदी अरेबियाकडून गॅस आयात करतो. हे गॅस टँकर्स सध्या इराणच्या लष्करी देखरेखीखाली असलेल्या भागात आहेत. परंतू, ते भारताचे आहेत म्हणून इराणने सोडण्याची परवानगी दिली आहे.
भारताचे कूटनीतिक प्रयत्न
भारत सरकार आणि इराणमध्ये सध्या उच्चस्तरीय चर्चा सुरू आहे. जर हे ६ टँकर्स सुरक्षितपणे भारताच्या दिशेने निघाले, तर देशातील गॅस साठ्यात मोठी वाढ होईल आणि युद्धाच्या काळात निर्माण झालेली टंचाईची भीती दूर होईल. भारताने 'युआन'मध्ये पेमेंट स्वीकारण्याबाबत अद्याप अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही, परंतु जहाजांच्या सुरक्षिततेसाठी मध्यस्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
पॅनिक बुकिंग टाळण्याचे आवाहन
पेट्रोलियम मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, देशात पुरेसा गॅस साठा उपलब्ध आहे. नागरिकांनी घाबरून 'पॅनिक बुकिंग' करू नये आणि केवळ आवश्यक असेल तरच सिलिंडर बुक करावा, असे आवाहन सहसचिव सुजाता शर्मा यांनी केले आहे. काळाबाजार रोखण्यासाठी अनेक राज्यांमध्ये छापेमारीही सुरू करण्यात आली आहे.