१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 22:32 IST2026-05-15T22:31:15+5:302026-05-15T22:32:21+5:30
Thunderstorm And Heavy Rain Alert News: सध्या संपूर्ण देशात मान्सून पूर्व घडामोडींना वेग प्राप्त झाला असून, अनेक राज्यांना वादळी वारे, गडगडाटासह पावसाच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
Thunderstorm And Heavy Rain Alert News: उत्तर भारताच्या अनेक राज्यांत पावसाने तडाखा दिल्याचे पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार वादळ आणि मुसळधार पावसामुळे किमान १११ जणांचा मृत्यू झाला असून ७२ जखमी झाले आहेत. वादळात ८७ घरांचे नुकसान झाले. यातच आता पुढील ११ तास १५ राज्यांसाठी महत्त्वाचे मानले जात असून, हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
देशात पुन्हा एकदा पाऊस आणि वादळाचा कहर पाहायला मिळणार आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश, बिहारसह १५ राज्यांसाठी वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या काळात लोकांनी अत्यंत सावध राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पावसासोबतच ताशी ८० ते ८५ किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहू शकतात. काही राज्यांमध्ये गारपिटीचा इशाराही देण्यात आला आहे. पश्चिम-मध्य बंगाल उपसागरावरील कमी दाबामुळे चक्रीय वाऱ्यांची स्थिती निर्माण होत आहे.
उत्तर प्रदेश, बिहार राज्यात वादळी पावसाचा इशारा
उत्तर प्रदेशच्या आग्रा, मथुरा, कानपूर, कुशीनगर, वाराणसी, प्रयागराज, जौनपूर, गाझीपूर, चंदौली, मिर्झापूर, आझमगड, सोनभद्र, मऊ, बलिया, कौशांबी, फतेहपूर आणि बलरामपूरमध्ये पाऊस आणि वादळाचा इशारा देण्यात आला आहे. या काळात ताशी ६० ते ६५ किलोमीटर वेगाने वारे वाहतील. दिल्लीच्या अनेक भागात पावसाची परिस्थिती असू शकते, असे म्हटले जात आहे. बिहारमधील गया, पश्चिम चंपारण, पूर्व चंपारण, सिवान, पाटणा, भोजपूर, सारण, शिवहर, भोजपूर, कैमूर, रोहतास, औरंगाबाद, मुंगेर, बांका, जमुई, दरभंगा, मधुबनी, सहरसा, भागलपूर, पूर्निया, अरहरिया, पूर्निया येथे मुसळधार पाऊस आणि वादळाचा इशारा देण्यात आला आहे. या काळात ताशी ८० ते ८५ किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेशातही पावसाचा कहर
हिमाचल प्रदेशमधील कांग्रा, चंबा, मंडी, उना, बिलासपूर, सोलन आणि शिमला येथे मुसळधार पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. वारे ताशी ७० ते ८० किलोमीटर वेगाने वाहतील. मध्य प्रदेशातील धार, विदिशा, रायसेन, बालाघाट, गुना, छतरपूर, रेवा, देवास, धार, सिंगरौली आणि सिधी येथील परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे. ताशी २० ते ३० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात.
महाराष्ट्रात काय होणार?
महाराष्ट्रात संमिश्र परिस्थिती कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी उष्णतेची तीव्र स्थिती असून काही ठिकाणी उष्णतेची लाटेसदृश्य स्थिती आहे. तर काही जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पावसाची नोंद होत आहे. वादळी पावसाचा प्रभाव वाढताना दिसत असून, अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाकडून मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस पावसाळी हवामान राहील, अशी शक्यता वर्तविली आहे. सध्या संपूर्ण देशात मान्सून पूर्व घडामोडींना वेग प्राप्त झाला आहे.