खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 21:46 IST2026-05-15T21:45:43+5:302026-05-15T21:46:26+5:30
दरम्यान, प्रशासकीय यंत्रणा आणि आरोग्य विभाग सक्रिय झाला असून प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे...

खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
मध्यप्रदेशातील श्योपूर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे टरबूज खाल्ल्याने एकाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर बाजारात विकल्या जाणाऱ्या टरबूजांच्या गुणवत्तेवरच मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्यात विषारी घटक अथवा घातक रसायने असण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच समोर येईल. दरम्यान, प्रशासकीय यंत्रणा आणि आरोग्य विभाग सक्रिय झाला असून प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं? -
मूळचे शाजापूर जिल्ह्यातील ४३ वर्षीय इंद्र कुमार परिहार हे श्योपूरमध्ये भाड्याच्या घरात कुटुंबासह राहत होते. ते व्यवसायाने ड्रायव्हर होते. माध्यमांतील वृत्तांनुसार, गुरुवारी रात्री इंद्र कुमार आणि त्यांचा २१ वर्षीय मुलगा विनोद यांची तब्येत ठीक नव्हती. त्यांनी शुक्रवारी सकाळी उठून टरबूज खाल्ले. मात्र, टरबूज खाल्ल्यानंतर काही वेळातच दोघांची प्रकृती कमालीची खालावली.
प्रकृती अधिकच खालावल्यानंतर, त्यांना तातडीने श्योपूर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्रकृती अधिक चिंताजनक झाल्याने इंद्र कुमार यांना कोटा येथे हलवण्याचा सल्ला देण्यात आला, मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. मुलगा विनोद याची प्रकृती अद्यापही नाजूक आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
जिल्हा रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉ. आर. बी. गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल; प्राथमिकदृष्ट्या हे पोटातील इन्फेक्शन असू शकते. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, हे टरबूज गुरुवारी संध्याकाळी खातौली तिराहा येथून खरेदी केले होते.