भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 22:15 IST2026-05-15T22:12:52+5:302026-05-15T22:15:27+5:30
२००३ मध्ये भारतीय पुरातत्व विभागाने (ASI) केलेल्या एका व्यवस्थेनुसार, हिंदू मंगळवारी पूजा करत होते. तर मुस्लीम शुक्रवारी नमाज पठण करत होते. मात्र, हिंदू पक्षाने न्यायालयात याचिका दाखल करत, विशेष पूजेच्या अधिकाराची मागणी केली होती.

भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील बहुचर्चित भोजशाळा आणि मौला कमाल मशीद वादावर आज शुक्रवारी उच्च न्यायालयाने एक मोठा निर्णय दिला. "वादग्रस्त ठिकाण हे देवी सरस्वतीचे मंदिर असून ऐतिहासिक आणि पुरातात्विक पुरावेही याला पुष्टी देतात, असे कोर्टाने आपल्या निर्णयात स्पष्टपणे नमूद केले आहे. याच बरोबर, मुस्लीम पक्षाला मशिदीसाठी दुसऱ्या ठिकाणी पर्यायी जागा उपलब्ध करून दिली जाऊ शकते, असेही न्यायालयाने सुचवले आहे. दरम्यान, या निकालावर 'एआयएमआयएम' प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांची प्रतिक्रियाही समोर आली आहे.
बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध -
या निकालासंदर्भात भाष्य करताना असदुद्दीन ओवैसी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर आपली भूमिका मांडली आहे. त्यांनी या निकालाची तुलना थेट अयोध्या प्रकरणाशी अथवा बाबरी प्रकरणाशी केली आहे. "आम्हाला आशा आहे की देशाचे सर्वोच्च न्यायालय हा निर्णय दुरुस्त करेल आणि उच्च न्यायालयाचा आदेश रद्द करेल. या निकालात बाबरी मशिदीच्या निकालासारखेच स्पष्ट साम्य दिसून येत आहे," असे ओवैसी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, न्यायमूर्ती विजय कुमार शुक्ला आणि न्यायमूर्ती आलोक अवस्थी यांच्या खंडपीठाने, मुस्लीम पक्षाला भोजशाळेत नमाज पठणाची परवानगी देणारा दुना आदेशही फेटाळला. २००३ मध्ये भारतीय पुरातत्व विभागाने (ASI) केलेल्या एका व्यवस्थेनुसार, हिंदू मंगळवारी पूजा करत होते. तर मुस्लीम शुक्रवारी नमाज पठण करत होते. मात्र, हिंदू पक्षाने न्यायालयात याचिका दाखल करत, विशेष पूजेच्या अधिकाराची मागणी केली होती.
हा परिसर परमार वंशाचे राजा भोज यांच्या काळातील संस्कृत शिक्षणाचे केंद्र आणि देवी सरस्वतीचे मंदिर -
महत्वाचे म्हणजे, "आम्ही सर्व तथ्ये आणि 'एएसआय' (ASI) कायदा बघितला. आर्किओलॉजी हे एक विज्ञान आहे. त्यावर आधारित निष्कर्षांवर विश्वास ठेवला जाऊ शकतो. याच बरोबर, संविधानाने दिलेले मूलभूत अधिकारही विचारात घेणे आवश्यक आहे. हा परिसर परमार वंशाचे राजा भोज यांच्या काळातील संस्कृत शिक्षणाचे केंद्र होते आणि देवी सरस्वतीचे मंदिर होते," असे न्यायालयाने म्हटले आहे.