‘एक्स्प्रेस वे’वर पुन्हा कोंडी, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक कोलमडली; ‘मिसिंग लिंक’ही ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 18:54 IST2026-05-15T18:53:53+5:302026-05-15T18:54:19+5:30
Mumbai Pune Expressway Missing Connecting Link Traffic Jam: गेल्या काही काळापासून पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक ठप्प झाल्याचे म्हटले जात आहे.

‘एक्स्प्रेस वे’वर पुन्हा कोंडी, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक कोलमडली; ‘मिसिंग लिंक’ही ठप्प
Mumbai Pune Expressway Missing Connecting Link Traffic Jam: ०१ मे २०२६ रोजी मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक म्हणजेच कनेक्टिंग लिंक वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यानंतरचे काही दिवस मुंबई ते पुणे या मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांनी मोठा सुटकेच निश्वास सोडला. परंतु, आता पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प झाल्याची माहिती मिळाली आहे. कनेक्टिंग लिंक मार्गावरही वाहतूक कोंडी झालेली आहे. वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्याचे सांगितले जात आहे.
मुंबई पुणे मार्गावरून जाताना खंडाळा घाटात मोठी वाहतूक कोंडी होत असे. परंतु, कनेक्टिंग लिंकमुळे आता अगदी वेगवान प्रवास होत असल्याने समाधान व्यक्त केले. परंतु, काही दिवसांपुरताच हा आनंद टिकल्याचे म्हटले जात आहे. पुण्याहून मुंबईच्या दिशेने येताना खालापूरला जिथे मिसिंग लिंक बाहेर पडतो, तिथपासून वाहतूक कोंडी झालेली आहे.
वाहनांच्या लांबच लांब रांगा
पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक पूर्ण ठप्प झालेली आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. काही प्रवाशांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खालापूर टोलनाका येथे मोठा अपघात झालेला आहे. सुमारे अर्ध्या तास वाहने जागच्या जागी आहेत. मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक अगदी सुरळीत सुरू आहे. त्यामुळे पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांनी आधी माहिती घ्यावी, मग प्रवासाला सुरुवात करावी, असे सांगितले जात आहे.
दरम्यान, वाहतूक पोलिसांनी तातडीने पावले उचलत वाहतूक सुरळीत करण्याचे काम हाती घेतल्याची माहिती देण्यात आली आहे. एक मार्गिका खुली करण्यात आली आहे. मिसिंग लिंकवरील वाहनांना प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे लवकरच हा मार्ग पुन्हा पूर्ववत होईल, असे म्हटले जात आहे.