ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 18:52 IST2026-05-15T18:52:03+5:302026-05-15T18:52:44+5:30
रशियाचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी ट्रम्प-जिनपिंग भेटीसंदर्भात भाष्य केले आहे. ते म्हणाले, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आपल्या आगामी चीन दौऱ्यात या विषयावर थेट शी जिनपिंग यांच्याशी संवाद साधण्याची शक्यता आहे.

ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच चीन दौरा केला. तीन दिवसांचा हा दौरा आटोपून ट्रम्प शुक्रवारी बीजिंगहून रवाना झाले. ट्रम्प आणि राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात तब्बल ४० तासांत पार पडलेल्या बैठकांकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. आता या बहुचर्चित भेटीवर रशियाचीही प्रतिक्रिया आली आहे.
पुतिन आणि जिनपिंग यांच्यात होणार चर्चा -
रशियाचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी ट्रम्प-जिनपिंग भेटीसंदर्भात भाष्य केले आहे. ते म्हणाले, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आपल्या आगामी चीन दौऱ्यात या विषयावर थेट शी जिनपिंग यांच्याशी संवाद साधण्याची शक्यता आहे. पुतिन यांच्या चीन दौऱ्याची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. दरम्यान, अमेरिका आणि चीन यांच्यातील उच्चस्तरीय चर्चेत नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, हे समजून घेण्यासाठी हा दौरा एक उत्तम संधी असेल, असेही पेस्कोव्ह यांनी नमूद केले.
...तेव्हा साहजिकच संपूर्ण जगाचे लक्ष त्याकडे असते -
पेस्कोव्ह पुढे म्हटले, "जेव्हा अमेरिका आणि चीन यांसारख्या जगातील दोन महासत्ता या स्तरावर संवाद साधतात, तेव्हा साहजिकच संपूर्ण जगाचे लक्ष त्याकडे असते. रशिया देखील या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. ट्रम्प आणि जिनपिंग यांची ही भेट केवळ द्विपक्षीय संबंधापुरतीच मर्यादित नाही. तर जागतिक शक्ती संतुलन, व्यापार, तंत्रज्ञान आणि पश्चिम आशियातील तणाव यांसारख्या अनेक कंगोरी तिला आहेत. यामुळे, या चर्चेचा आंतरराष्ट्रीय राजकारणावर काय परिणाम होतो? हे बघावे लागेल.