इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 21:08 IST2026-05-15T21:05:38+5:302026-05-15T21:08:19+5:30
Iran Foreign Minister Abbas Araghchi In Delhi: अमेरिकेवर अजिबात विश्वास नाही. कोणत्याही धमक्यांना घाबरत नाही. आम्हाला केवळ आदराची भाषा समजते, असे इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी दिल्लीत म्हटले आहे.

इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
Iran Foreign Minister Abbas Araghchi In Delhi: ब्रिक्स सदस्य देशांच्या दोन दिवसीय शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी रशिया, इराणचे परराष्ट्र मंत्री भारतात आहेत. अमेरिकाइराण युद्ध, जागतिक तेल संकट, रशिया युक्रेन युद्ध अशा मुद्द्यांमुळे ही शिखर परिषद महत्त्वाची ठरत आहे. यातच इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी भारताची भूमिका महत्त्वाची असून, आम्ही स्वागत करू, असे म्हटले आहे.
इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी सांगितले की, इराणशी संबंधित कोणत्याही मुद्द्यावर लष्करी कारवाई हा तोडगा असू शकत नाही. इराण एका अकारण आक्रमणाचा बळी ठरला आहे. जर समोरची बाजू गंभीर असेल, तर आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. अमेरिकेवर विश्वास न ठेवण्याची आमच्याकडे सर्व कारणे आहेत. ते त्यांचे कोणतेही उद्दिष्ट साध्य करू शकलेले नाहीत. या प्रदेशात शांततेसाठी भारत जी कोणतीही भूमिका बजावू शकेल, त्याचे आम्ही स्वागत करू, असे अराघची यांनी म्हटले आहे.
आम्ही मुत्सद्देगिरीसाठीही तयार आहोत
अराघची यांनी शुक्रवारी नवी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत सांगितले की, कदाचित पुन्हा लढाई सुरू होईल, पण आम्ही मुत्सद्देगिरीसाठीही तयार आहोत. अमेरिकेकडून येणाऱ्या अविश्वास आणि परस्परविरोधी संदेशांमुळे सध्याच्या चर्चेत अडथळा येत आहे. मला आशा आहे की अखेरीस मुत्सद्देगिरीचाच विजय होईल. इराणने कधीही अण्वस्त्रांची मागणी केलेली नाही. ते आमचे धोरण नाही, असेही त्यांनी नमूद केले. आमचा अमेरिकेवर अजिबात विश्वास नाही. कोणत्याही राजनैतिक प्रयत्नांमधील हा सर्वांत मोठा अडथळा आहे, असेही अराघची यांनी स्पष्ट केले.
अत्यंत क्रूर युद्धात निकराने लढा दिला
आमच्याविरुद्ध पुकारल्या गेलेल्या एका अत्यंत क्रूर युद्धात निकराने लढा दिला आहे. त्यांना (अमेरिकेला) आपली कोणतीही उद्दिष्टे साध्य करता आली नाहीत. हे स्पष्ट आहे की, ज्या गोष्टी त्यांना लष्करी बळावर साध्य करता आल्या नाहीत, त्या गोष्टी त्यांना वाटाघाटींच्या मेजावरही साध्य करता येणार नाहीत. अर्थात, जोपर्यंत दोन्ही पक्षांचा फायदा होईल असा एखादा तोडगा निघत नाही, असेही अराघची यांनी सांगितले.
दरम्यान, सध्या युद्धविराम लागू आहे. परंतु, परिस्थिती खूप अस्थिर आहे. असे असले तरी युद्धविराम टिकवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. जेणेकरून राजनैतिक चर्चेला संधी मिळू शकेल. त्यांनी आमची वारंवार परीक्षा घेतली आहे. आम्ही कोणत्याही दबावाला किंवा धमक्यांना कधीही बळी पडत नाही. आम्ही कोणत्याही निर्बंधांनाही विरोध करतो. इराणी जनतेला केवळ आदराचीच भाषा समजते, असे अब्बास अराघची यांनी म्हटले आहे.