परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 00:12 IST2026-05-16T00:10:07+5:302026-05-16T00:12:51+5:30
PM Narendra Modi Did The Fact Check: परदेश प्रवासावर कर लावण्याच्या प्रस्तावावर सर्वोच्च स्तरावर चर्चा सुरू आहे. हा कर वर्षभरासाठी असू शकतो, असे वृत्त देण्यात आले होते.

परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
PM Narendra Modi Did The Fact Check: पंतप्रधान मोदी आताच्या घडीला परदेश दौऱ्यावर आहेत. आखाती देशातील वाढता तणाव, तेल संकट या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. यातच एका वृत्तवाहिनीने परदेश प्रवासावर कर, उपकर किंवा अधिभार लावण्याबाबत एक वृत्त देत धाडसी दावा केला होता. परंतु, आता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, अशी वृत्ते खोटी आहेत. यातील काहीही सत्य नाही, असे स्पष्ट केले आहे.
झाले असे की, काही वृत्तवाहिन्यांनी केंद्र सरकार आता परदेश प्रवासावर अतिरिक्त आर्थिक भार टाकण्याचा विचार करत आहे, असा दावा करणारे वृत्त प्रसारित केले होते. यामुळे संपूर्ण देशात उलट-सुलट चर्चांना सुरुवात झाली. सोशल मीडियावरही विविधांगी चर्चा रंगल्या. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याची दखल घेत, स्वतः पुढे येऊन हे वृत्त पूर्णपणे खोटे असल्याचे सांगितले आहे. पंतप्रधान मोदी यांनी एक्सवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे.
परदेशी जायला आता कर लादण्याचा प्रस्ताव होता
रिपोर्टनुसार, परदेश प्रवासावर उपकर/कर/अधिभार लावण्याच्या प्रस्तावावर सर्वोच्च स्तरावर चर्चा सुरू आहे. परदेश प्रवासावरील हा उपकर/कर/अधिभार थेट केंद्र सरकारकडे जमा होईल; तो 'विभाज्य निधी'चा भाग असणार नाही. युद्धाशी संबंधित आर्थिक परिणामांची तीव्रता कमी करणे, हा परदेश प्रवासावरील या उपकर/कर/अधिभाराचा मुख्य उद्देश आहे. परदेश प्रवासावरील हा उपकर/कर/अधिभार केवळ एका वर्षासाठी (तात्पुरत्या स्वरूपात) असण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि आयातीचा वाढता खर्च यांचा बोजा हलका करण्यासाठी परदेश प्रवासावरील या उपकर/कर/अधिभाराचा वापर केला जाईल, असे या वृत्तात म्हटले होते. परंतु, या सर्व गोष्टी पंतप्रधान मोदी यांनी फेटाळून लावल्या.
हे पूर्णपणे असत्य आहे, यात सत्याचा लवलेशही नाही.
पंतप्रधान मोदी यांनी एक्सवर पोस्ट करत सांगितले की, हे पूर्णपणे असत्य आहे. यात सत्याचा लवलेशही नाही. परदेश प्रवासावर अशा प्रकारचे निर्बंध घालण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आमच्या जनतेसाठी ‘व्यवसाय सुलभता’ आणि ‘जीवन सुलभता’ सुधारण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्टपणे सांगितले.
दरम्यान, स्वतः पंतप्रधान मोदी यांनी याबाबत स्पष्टता आणल्यामुळे परदेश प्रवासावर कर लावण्याच्या दाव्यांना पूर्णविराम मिळाला आहे. तज्ज्ञांच्या मते, आर्थिक अनिश्चितता आणि जागतिक तणावाच्या काळात अशा अफवा वेगाने पसरतात. पंतप्रधानांनी खुलासा केल्यामुळे बाजारपेठेला आणि जनतेला दिलासा मिळाला आहे. परदेश प्रवास केवळ पर्यटनापुरता मर्यादित नाही. त्यात व्यवसाय, शिक्षण, गुंतवणूक आणि सांस्कृतिक देवाणघेवाण यांचाही समावेश होतो.
This is totally false.
Not an iota of truth in this.
There is no question of putting such restrictions on foreign travel.
We remain committed to improving ‘Ease of Doing Business’ and ‘Ease of Living’ for our people. https://t.co/9lxjbxz0nV— Narendra Modi (@narendramodi) May 15, 2026