मॉस्को - संरक्षण क्षेत्रात भारत एक मजबूत खेळाडू म्हणून नावारुपाला येत आहे. भविष्यात शस्त्रांच्या जागतिक बाजारात वर्षोनुवर्षे दबदबा राखणाऱ्या रशियासारख्या देशांना भारत मागे टाकू शकतो असा दावा रशियन पत्रकार वसिली गोलोव्हनिन यांनी केला आहे. जागतिक शस्त्रास्त्र बाजारात रशियाला भारताकडूनच टक्कर मिळत आहे. भारत जागतिक शस्त्रास्त्र बाजारात एक नवीन खेळाडू म्हणून वेगाने उदयास येत आहे आणि एके काळी मॉस्कोचा पारंपरिक बालेकिल्ला असलेल्या क्षेत्रांमध्ये रशियाशी वाढती स्पर्धा करत आहे.
रशियन पत्रकार वसिली गोलोव्हनिन यांनी म्हटलं की, भारताची संरक्षण निर्यात २०२५ मध्ये ४ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे, जी २०१४ मध्ये नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासूनच्या तुलनेत तब्बल ५६ पटींची वाढ आहे. भारताने २०२० पासून पूर्णपणे नवीन बाजारपेठांमध्ये प्रवेश केला आहे. भारताच्या एकूण शस्त्र निर्यातीत आता फिलीपिन्सचा वाटा ४२% आहे, त्यानंतर अर्मेनिया (३२%) आणि व्हिएतनाम (११%) यांचा क्रमांक लागतो असं त्यांनी सांगितले. रशियन पत्रकारांनी विशेषतः अर्मेनियाचा उल्लेख केला, जो काही वर्षांपूर्वीपर्यंत रशियन शस्त्रांवर अवलंबून होता पण आता त्याने भारतीय शस्त्रे खरेदी करण्यास सुरुवात केली आहे.
शस्त्रास्त्र निर्यातीत भारताची झपाट्याने वाढ
एकेकाळी अमेरिका आणि फ्रान्ससोबत रशिया हा जगातील सर्वात मोठा शस्त्रास्त्र निर्यातदार देश होता. त्याने चीन आणि भारतासह बहुतेक आशियाई आणि आफ्रिकन देशांना शस्त्रे विकली. तुर्की आणि चीनसारख्या अनेक नवीन शस्त्रास्त्र निर्यातदार देशांनी आफ्रिकन देशांमध्ये आपले स्थान निर्माण करण्यास सुरुवात केली आहे तर अनेक देशांनी भारतीय शस्त्रास्त्रे खरेदी करण्यासही सुरुवात केली आहे. रशियन भाषेतील 'इकोएफएम' (echofm) या वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या जपानी पत्रकार यासुओ ताकेउची यांच्या एका लेखात भारतीय शस्त्रास्त्रांवर चर्चा करण्यात आली आहे. भारत आता केवळ शस्त्रास्त्रांचा खरेदीदार राहिलेला नाही तर तो एक प्रमुख निर्यातदार बनण्याच्या तयारीत आहे यावर सिप्री (SIPRI) डेटाचा हवाला देत यासुओ ताकेउची यांनी जोर दिला.
लेखात काय लिहिलंय?
२०२० पर्यंत भारताची शस्त्र निर्यात खूपच कमी होती परंतु बदलत्या जागतिक परिस्थितीचा फायदा घेऊन भारताने शून्यातून सुरुवात केली आहे आणि एक मोठी बाजारपेठ तयार करण्यास सुरुवात केली आहे. त्यात फिलीपिन्स आणि अर्मेनियासारख्या देशांचाही उल्लेख केला. फिलीपिन्स हा भारताचा सर्वात मोठा ग्राहक आहे. त्याने भारताकडून ब्रह्मोस सुपरसॉनिक जहाजविरोधी क्षेपणास्त्रे खरेदी केली आहेत. ब्रह्मोस हे भारताने रशियाच्या सहकार्याने विकसित केले आहे आणि या विक्रीतून मॉस्कोलाही फायदा होतो.
अर्मेनिया बनला भारताचा एक मजबूत संरक्षण भागीदार
रशियन शस्त्रांवरील अत्यधिक अवलंबित्व हे अझरबैजानविरुद्धच्या युद्धात अर्मेनियाच्या पराभवाचे कारण ठरले. अनेक रशियन शस्त्रे त्यांच्या पूर्ण क्षमतेनुसार कामगिरी करण्यास अयशस्वी ठरली तर भारताच्या पिनाका रॉकेट्सनी अझरबैजानचे मोठे नुकसान केले. त्यामुळे अर्मेनियाने अधिकाधिक भारतीय शस्त्रे खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. सिप्रीच्या (SIPRI) आकडेवारीनुसार, २०११ ते २०२० काळात अर्मेनियाच्या एकूण शस्त्र आयातीमध्ये रशियाचा वाटा ९४% होता. मात्र नव्या आकडेवारीत २०२२-२०२४ या कालावधीत अर्मेनियाच्या एकूण शस्त्र आयातीमध्ये भारताचा वाटा आता ४३% पर्यंत वाढला आहे. भारत आता अर्मेनियाचा सर्वात मोठा शस्त्र पुरवठादार बनला आहे. अर्मेनियाने भारताकडून पिनाका रॉकेट सिस्टम, आकाश एअर डिफेन्स सिस्टम आणि एटीएजीएस (ATAGS) हॉवित्झर यांसारखी प्रमुख शस्त्रे खरेदी केली आहेत.
दरम्यान, भारताच्या एकूण खरेदीपैकी अंदाजे ३६-४०% वाटा रशियाचा असून तो भारताचा सर्वात मोठा शस्त्र पुरवठादार आहे. प्रादेशिक बाजारपेठांमध्ये निर्यात करारांसाठी भारताची मॉस्कोसोबत स्पर्धा वाढत आहे. इंडोनेशिया, संयुक्त अरब अमीरात आणि व्हिएतनामसारखे देश भारतासोबत ब्रह्मोस क्षेपणास्त्र करारांवर वाटाघाटी करत आहेत तर दुसरीकडे अमेरिका आणि अनेक युरोपीय देशांनी भारतीय शस्त्रे आणि शस्त्रांचे सुटे भाग खरेदी करण्यास मोठ्या प्रमाणात सुरुवात केली आहे.
Web Summary : India's defense exports are rapidly increasing, challenging Russia in the global arms market. Countries like Armenia are turning to Indian weapons, reducing reliance on Russia. India's defense exports are projected to reach $4 billion by 2025, a 56-fold increase since 2014. This shift signifies India's growing influence.
Web Summary : भारत का रक्षा निर्यात तेजी से बढ़ रहा है, जो वैश्विक हथियार बाजार में रूस को चुनौती दे रहा है। आर्मेनिया जैसे देश रूसी हथियारों पर निर्भरता कम करके भारतीय हथियारों की ओर रुख कर रहे हैं। 2025 तक भारत का रक्षा निर्यात $4 बिलियन तक पहुंचने का अनुमान है, जो 2014 से 56 गुना अधिक है। यह बदलाव भारत के बढ़ते प्रभाव को दर्शाता है।