बुलढाणा - खामगाव शहरातील बर्डे प्लॉट परिसरात लग्न समारंभात झालेल्या किरकोळ वादाने गंभीर रूप धारण करत २२ वर्षीय तरुणाचा खून झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक शोएबखान अमिनखान ( २२) हा २५ एप्रिल रोजी रात्री जोशी लेआउट येथील मैदानावर सुरू असलेल्या लग्न समारंभात उपस्थित होता. रात्री सुमारे १०.०० ते १०.४० वाजण्याच्या दरम्यान नृत्य करण्याच्या कारणावरून त्याचा काही युवकांशी वाद झाला. प्रारंभी किरकोळ असलेला हा वाद पुढे चिघळला.
वाद तीव्र झाल्यानंतर आरोपींनी एकत्रितपणे शोएबखान याच्यावर चाकू, फायटर, वस्तरा व दगड यांच्या साहाय्याने हल्ला केला. या हल्ल्यात त्याच्या डोक्यावर व शरीरावर गंभीर दुखापती झाल्या. जखमी अवस्थेत त्याला तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी फिर्यादी मोहम्मद साबीर शेख मुसा (३६, रा. बर्डे प्लॉट, खामगाव) यांच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम १०३(१) , ११८(२) , ११५(२) व ३(५) अन्वये शेख आफताब, फैजान खान, शेख तालीब (सर्व रा. बर्डे प्लॉट, खामगाव) तसेच शेख रफिक (रा. अकोला) यांच्या मुला विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक लोढा, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. घटनास्थळाचा पंचनामा करून पुरावे संकलित करण्यात आले आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मंदार पुरी यांच्याकडे सोपविण्यात आला असून आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी आवश्यक ती खबरदारी घेतली आहे.
रुग्णालयात नातेवाईकांचा आक्रोश!घटनेनंतर युवकाला गंभीर अवस्थेत सामान्य रुग्णालयात आणताच नातेवाईक व नागरिकांनी मोठ्या संख्येने रुग्णालयात गर्दी केली. त्याच्या मृत्यूची वार्ता ऐकताच रुग्णालयाच्या आवारात शोकाकुल वातावरण पसरले होते. मृताच्या नातेवाईकांनी आक्रोश करत आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. काही महिलांनी रडत-ओरडत संताप व्यक्त केला, तर तरुणांमध्येही संतापाची लाट उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रुग्णालयात धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रुग्णालय परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
Web Summary : A 22-year-old was murdered in Khamgaon after a dance-related argument at a wedding. Four suspects are charged. The victim, Shoebkhan, was attacked with knives and stones. Relatives protested at the hospital, demanding immediate arrests. Police are investigating and maintaining order.
Web Summary : खामगांव में एक शादी में नाचने को लेकर विवाद के बाद 22 वर्षीय युवक की हत्या कर दी गई। चार संदिग्धों पर आरोप लगे हैं। मृतक शोएबखान पर चाकू और पत्थरों से हमला किया गया। परिजनों ने अस्पताल में विरोध प्रदर्शन कर तत्काल गिरफ्तारी की मांग की। पुलिस जांच कर रही है और व्यवस्था बनाए हुए है।