Join us
Daily Top 2Weekly Top 5

"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्नींना स्पष्ट शब्दांत सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2026 10:13 IST

धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर रितेश देशमुखने प्रतिक्रिया देत त्यांना फटकारलं आहे. 

बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे चर्चेत आले आहे. धीरेंद्र शास्त्री यांच्यावर राज्यातून सर्वच स्तरातून टीका होते आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे रामदास स्वामींना गुरूसमान मानत होते असा दावा करत धीरेंद्र शास्त्रींनी त्यांच्या व्याख्यानात याबाबत किस्सा सांगितला होता. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर रितेश देशमुखने प्रतिक्रिया देत त्यांना फटकारलं आहे. 

रितेश देशमुखने त्याच्या आगामी 'राजा शिवाजी' सिनेमाच्या निमित्ताने भिवंडी तालुक्यातील मराडे पाडा येथील शिवक्रांती प्रतिष्ठानच्या छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तीपीठ याठिकाणी भेट दिली. जिनिलीयासोबत रितेशने छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेत महाआरती केली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना धीरेंद्र शास्त्री यांच्या विधानाबाबत रितेशने प्रतिक्रिया दिली. रितेश म्हणाला, "मी काही ऐकलेले नाही. मला ते विषय माहीत नाहीत. पण महाराजांबद्दल अपशब्द वापरलेले कोणीही खपवून घेणार नाही". 

काय म्हणाले होते धीरेंद्र शास्त्री? 

छत्रपती शिवाजी महाराजांनी सत्ता सोडण्याचे ठरविले होते असे धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले. "छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करून थकले व ते रामदास स्वामींकडे गेले. आता मला जास्त लढायचे नाही व हे मुकूट व सत्ता तुम्ही सांभाळा, असे ते त्यांना म्हणाले. रामदास स्वामी त्यांना म्हणाले की ठीक आहे. मात्र शिष्याचे कर्तव्य हे गुरूच्या आदेशांचे पालन करणे हे आहे. त्यामुळे आता माझी ही सत्ता तुम्ही सांभाळावी, असे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना म्हटले होते," असा दावा धीरेंद्र शास्त्री यांनी केला.

रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' सिनेमा 

रितेश देशमुखचं दिग्दर्शन असलेला 'राजा शिवाजी' सिनेमा येत्या १ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. या सिनेमात रितेश छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. मराठीतील हा पहिलाच भव्यदिव्य ऐतिहासिक सिनेमा आहे. या सिनेमाच विद्या बालन, जिनिलीया, अभिषेक बच्चन, फरदीन खान, संजय दत्त या बॉलिवूड कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Riteish Deshmukh slams Dhirendra Shastri's remarks about Chhatrapati Shivaji Maharaj.

Web Summary : Riteish Deshmukh condemned Dhirendra Shastri's controversial claims about Chhatrapati Shivaji Maharaj and Ramdas Swami. Deshmukh, visiting a Shivaji Maharaj temple, asserted that disrespect towards the Maratha king will not be tolerated. He's starring in 'Raja Shivaji,' releasing May 1st.
टॅग्स :रितेश देशमुखबागेश्वर धामछत्रपती शिवाजी महाराज