आसाम, बंगालमधील विजयानंतर भाजपा ‘या’ राज्यात ऑपरेशन लोटसच्या तयारीत? बड्या नेत्याने दिले संकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 08:53 IST2026-05-06T08:53:05+5:302026-05-06T08:53:23+5:30
Assembly Election Result:आसाम आणि बंगालमधील विजयानंतर भाजपाने एका राज्यात ऑपरेशन लोटस राबवण्याची तयारी सुरू केली असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तसेच भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. अजय आलोक यांनी सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टकडे त्याचे संकेत म्हणून पाहिले जात आहे.

आसाम, बंगालमधील विजयानंतर भाजपा ‘या’ राज्यात ऑपरेशन लोटसच्या तयारीत? बड्या नेत्याने दिले संकेत
नुकत्याच झालेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये केंद्रातील भाजपाला मोठं यश मिळवलं आहे. भाजपाने आसाममधील सत्ता राखतानाच पश्चिम बंगालसारख्या मोठ्या राज्यात स्पष्ट बहुमतासह दणदणीत विजय मिळवला आहे. दरम्यान, आसाम आणि बंगालमधील विजयानंतर भाजपाने एका राज्यात ऑपरेशन लोटस राबवण्याची तयारी सुरू केली असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तसेच भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. अजय आलोक यांनी सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टकडे त्याचे संकेत म्हणून पाहिले जात आहे.
त्याचं झालं असं की, आसाममध्ये जोरदार मोर्चेबांधणी करूनही काँग्रेसला दारुण पराभव पत्करावा लागला होता. दरम्यान, आसाममध्ये काँग्रेसचा इंडिया आघाडीमधील मित्रपक्ष असलेल्या झारखंड मुक्ती मोर्चा या पक्षाने सुमारे १६ जागांवर उमेदवार दिले होते. तसेच या पक्षाने एकही जागा जिंकली नसली तरी यापैकी ७ मतदारसंघात १५ हजारांहून अधिक मतं मिळवली. याचा फटका काँग्रेसला बसला होता. यावरूनच भाजपाचे मुख्य प्रवक्ते अजय आलोक यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे.
काय म्हणाले अजय आलोक?
अजय आलोक यांनी एक्सवर एक पोस्ट लिहून दोन महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष वेधले आहे. काँग्रेसने झारखंड मुक्ती मोर्चाच्या उमेदवारांनी आसाममध्ये काँग्रेसची मतं कापली.म्हणजेच झारखंड मुक्ती मोर्चामुळे काँग्रेसला नुकसान झालं आहे. झारखंड मुक्ती मोर्चाने काँग्रेसची लंका पेटवली आहे, असा टोला लगावला आहे. तर अजय आलोक यांनी उपस्थित केलेल्या दुसऱ्या मुद्द्यामधून ऑपरेशन लोटसचे संकेत दिले आहेत. त्यात ते म्हणतात की, गंगोत्री ते गंगासागरदरम्यान, झारखंड एखाद्या बंधाऱ्याप्रमाणे आहे. तसेच तो बंधाराही लवकर तुटेल. अजय आलोल यांच्या म्हणण्याचं तात्पर्य म्हणजे गंगा नदीचं उगमस्थान असलेल्या उत्तराखंडमधील गंगोत्रीपासून ते पश्चिम बंगालमधील गंगासागरपर्यंत गंगा नदीचा मार्ग असलेल्या सर्व ठिकाणी भाजपाची सत्ता आली आहे. मात्र या मार्गात असलेल्या झारखंडमध्ये विरोधी पक्षांचं सरकार आहे. आता लवकरच तिथेही भाजपाची सत्ता येईल, असे अजय आलोक यांना सूचित करायचे होते.
विरोधी पक्षांनी लगावला असा टोला
दरम्यान, अजय आलोक यांच्या या दाव्यानंतर विरोधी पक्षांमध्ये खळबळ उडाली आहे. तसेच झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेसने त्याविरोधात तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. झारखंड मुक्ती मोर्चाच्या सरचिटणीस सुप्रिया भट्टाचार्य यांनी सांगितले की, झारखंड हा साधासुधा बंधारा नाही तर भाक्रा नांगल प्रमाणे भक्कम बंधारा आहे. तसेच तो पार करणे खूप कठीण आहे. झारखंड मुक्ती मोर्चाने एका रणनीतीनुसार आसाममध्ये निवडणूक लढवली होती. आता त्यामधून भाजपा काढायचा तो अर्थ काढू शकतो. त्यामुळे आम्हाला काहीही फरक पडत नाही.
अजय आलोक यांना प्रत्युत्तर देताना काँग्रेसचे सरचिटणीस आलोक कुमार दुबे यांनी सांगितले की, काँग्रेस हा देशातील सर्वात जुना आणि सशक्त पक्ष आहे. त्यामुळे अशा प्रकारचे आकडे दाखवून त्याला कमकुवत करता येणार नाही.