४४ अंशांनी नागपूर होरपळले; उष्माघाताचे ३१ रुग्ण, शाळा-महाविद्यालयांना आज सुटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 15:09 IST2026-04-18T15:08:58+5:302026-04-18T15:09:41+5:30

Nagpur : वाढत्या उन्हाने नागपूर अक्षरशः होरपळून निघत असून, शुक्रवारी तापमान थेट ४४ अंश सेल्सिअसवर पोहोचले. या हंगामातील हा आतापर्यंतचा सर्वाधिक उच्चांक ठरला आहे.

Nagpur swelters at 44 degrees; 31 patients with heatstroke, schools and colleges closed today | ४४ अंशांनी नागपूर होरपळले; उष्माघाताचे ३१ रुग्ण, शाळा-महाविद्यालयांना आज सुटी

Nagpur swelters at 44 degrees; 31 patients with heatstroke, schools and colleges closed today

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
वाढत्या उन्हाने नागपूर अक्षरशः होरपळून निघत असून, शुक्रवारी तापमान थेट ४४ अंश सेल्सिअसवर पोहोचले. या हंगामातील हा आतापर्यंतचा सर्वाधिक उच्चांक ठरला आहे. वाढत्या उष्णतेचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा परिणाम लक्षात घेता प्रशासनाने १८ एप्रिल रोजी सर्व शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेसना सुटी जाहीर केली आहे. दरम्यान, उष्णतेच्या लाटेचा परिणाम आरोग्यावरही दिसून येत असून, शहरात आतापर्यंत उष्माघाताशी संबंधित ३१ रुग्णांची नोंद झाली आहे.

गेल्या पाच दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. हवामान विभागाने १८ व १९ एप्रिलदरम्यान 'हीट वेव्ह'चा इशारा दिला असून, तापमान सामान्यपेक्षा ४ ते ५ अंशांनी जास्त राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. कोरड्या वातावरणामुळे उष्माघाताचा धोका वाढला असून, नागरिकांना दुपारी १२ ते ४ या वेळेत बाहेर पडणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये तापमान ४४ अंशांच्या पुढे गेले असून, संपूर्ण प्रदेश उष्णतेच्या लाटेत सापडला आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत सुटीचा निर्णय

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अंतर्गत अधिकारांचा वापर करत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत शनिवारी सुटीचा निर्णय घेतला. प्रशासनाने पालकांना मुलांची विशेष काळजी घेण्याचे, त्यांना पुरेसे पाणी पाजण्याचे व हलके कपडे परिधान करण्याचे आवाहन केले आहे.

उष्माघातसदृश थकव्याचे सर्वाधिक रुग्ण

उष्णतेच्या वाढत्या तडाख्याचा परिणाम आरोग्यावरही दिसू लागला आहे. १ मार्च ते १६ एप्रिलदरम्यान नोंदवलेल्या ३१ रुग्णांमध्ये 'हीट एक्झॉशन' अर्थात उष्माघातासारख्या तीव्र थकव्याचे १३ रुग्ण आढळले. याशिवाय 'हीट रॅश' (घामोळे) चे १० आणि 'हीट क्रॅम्प्स'चे (स्नायूंमध्ये पेटके) ८ रुग्ण नोंदले गेले आहेत. ही आकडेवारी वाढत्या उष्णतेचा धोकादायक इशारा असल्याचे बोलले जात आहे.

आरोग्य यंत्रणा सतर्क

दरम्यान, मनपाच्या आरोग्य विभागाने परिस्थितीचा आढावा घेत 'हीट अॅक्शन प्लॅन' अंतर्गत विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. रुग्णालयांमध्ये औषधे व आवश्यक साहित्य उपलब्ध ठेवण्यात आले असून, आरोग्य यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे. पुढील दोन दिवसही उष्णतेचा तडाखा कायम राहण्याची शक्यता असल्याने प्रशासन आणि नागरिकांनी अधिक खबरदारी घेण्याचे आवाहन मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी केले आहे.

२० व २१ एप्रिलला ढगांची शक्यता

हवामान विभागाने २० व २१ एप्रिल रोजी आकाश ढगाळ राहण्यासोबतच विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. मात्र, त्यापूर्वी दोन दिवस उष्णतेचा कहर कायम राहणार आहे.

Web Title : नागपुर में 44 डिग्री तापमान; लू से बीमार, स्कूल बंद

Web Summary : नागपुर में पारा 44 डिग्री सेल्सियस तक पहुंचा, लू का अलर्ट। 18 अप्रैल को स्कूल-कॉलेज बंद। 31 हीटस्ट्रोक के मामले सामने आए, स्वास्थ्य उपाय और दोपहर की धूप से बचने की सलाह जारी। 20-21 अप्रैल को बादल छाने और हल्की बारिश की संभावना।

Web Title : Nagpur Scorches at 44 Degrees; Heatwave Sickens, Schools Closed

Web Summary : Nagpur hits 44°C, triggering heatwave alerts. Schools and colleges are closed on April 18th. 31 heatstroke cases reported, prompting health measures and public advisories to avoid midday sun and stay hydrated. Relief expected with possible clouds and light rain on April 20-21.