नागपुरात नियतीचा क्रूर डाव ! मुलीच्या लग्नाला १० दिवस बाकी असतानाच आईचा दुर्दैवी अंत; थरारक CCTV समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 17:00 IST2026-05-02T16:58:41+5:302026-05-02T17:00:19+5:30
Nagpur News: नागपूरच्या पाचपावली परिसरातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. ज्या घरात काही दिवसांवर मुलीचे लग्न होते, तिथे आता शोककळा पसरली आहे. एका बेजबाबदार वाहनचालकामुळे एका कुटुंबाचा आनंद क्षणात हिरावला गेला आहे.

Fate's cruel plan in Nagpur! Mother's tragic end just 10 days before daughter's wedding; Thrilling CCTV footage
नागपूर : नागपुरात रस्ते अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. शहराच्या पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या राणी दुर्गावती चौकात गुरुवारी दुपारी एक भीषण अपघात घडला. या अपघातात ४३ वर्षीय केसर शरणागत या महिलेचा जागीच मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे, अवघ्या १० दिवसांवर मुलीचा विवाह सोहळा असतानाच आईवर काळाने झडप घातल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
लग्नाच्या खर्चासाठी पैसे काढले अन्...
मिळालेल्या माहितीनुसार, मृत केसर शरणागत या आपल्या पतीसोबत दुपारी ३ च्या सुमारास बँक ऑफ बडोदाच्या एटीएममध्ये गेल्या होत्या. मुलीच्या लग्नाची खरेदी आणि इतर खर्चासाठी एटीएममधून पैसे काढून त्या बाहेर आल्या. त्या आपल्या दुचाकीजवळ उभ्या असतानाच मागून आलेल्या एका भरधाव टाटा एस (MH-40, BG-4966) वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली.
मद्यधुंद चालकाचा निष्काळजीपणा
अपघाताचा हा संपूर्ण थरार जवळच असलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, टाटा एसचा चालक भास्कर राऊत हा मद्यधुंद अवस्थेत होता. त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुसऱ्या एका वाहनाला धडक दिली आणि त्या धडकेत केसर शरणागत या चिरडल्या गेल्या. धडक इतकी भीषण होती की त्यांचा जागीच मृत्यू झाला.
नागरिकांचा संताप आणि पोलिसांची कारवाई
घटनेनंतर संतप्त नागरिकांनी परिसरात गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच पाचपावली पोलिसांनी तातडीने धाव घेऊन आरोपी चालक भास्कर राऊत याला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी वाहन जप्त केले असून आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बाबाराव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली केला जात आहे.