रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2026 05:46 IST2026-05-03T05:44:12+5:302026-05-03T05:46:25+5:30
मृत पावलेल्या कामगारांची नावे रघुनाथ दास (३८, ओरिसा) आणि काला सिंग (४५, पंजाब) आहे. डिबी रिअॅलिटी कंपनीच्या जागेत कोस्टल रोडचे कोस्टल गर्डर बनविण्याचे काम एल अँड टी कडून सुरू आहे.

रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
मिरा रोड : मिरा रोड रेल्वे स्थानकालगत पश्चिमेकडील बाजूला असलेल्या १०० एकर जमिनीत दहिसर भाईंदर रस्त्याच्या कामाकरिता 'यार्ड' उभारण्याचे काम सुरू आहे. या कामादरम्यान क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून दोन कामगारांच्या अंगावर कोसळून झालेल्या दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भाईंदर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून त्यात तपास करून जबाबदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
मृत पावलेल्या कामगारांची नावे रघुनाथ दास (३८, ओरिसा) आणि काला सिंग (४५, पंजाब) आहे. डिबी रिअॅलिटी कंपनीच्या जागेत कोस्टल रोडचे कोस्टल गर्डर बनविण्याचे काम एल अँड टी कडून सुरू आहे. या कामादरम्यान शनिवारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास कंपनीने उभारलेल्या क्रेनच्या प्लॅटफॉर्मवर काम करताना तो प्लॅटफॉर्म अचानक कोसळला. या अपघातात १२ मीटर उंचीवरून पडल्याने दोन्ही कामगार गंभीर जखमी झाले. त्यांना भाईंदरमधील टेंबा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आला.
मिरा रोड रेल्वे स्थानकाजवळ क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून झालेल्या अपघातानंतर बचावकार्य सुरू असताना.
भाईंदर पोलिसांकडून अकस्मात मृत्यूची नोंद
भाईंदर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत भाईंदर पश्चिमेच्या भारतरत्न पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले.
याप्रकरणी भाईंदर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र कांबळे व पोलिस निरीक्षक महेंद्र निंबाळकर यांनी दिली आहे.
दुर्घटनेची 'व्हीजेआयटी' करणार चौकशी
दहिसर - भाईंदर जोड मार्ग कास्टिंग यार्ड येथे आज प्लॅटफॉर्म कोसळून दोन कामगारांचा मृत्यू झाल्याच्या घटनेची व्हीजेआयटी'च्या तज्ञांमार्फत करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे.
चौकशीत कामगार सुरक्षिततेत कोणतीही त्रुटी २ आढळल्यास संबंधित कंत्राटदारांवर कठोर कारवाई करण्यात येईल. कार्यस्थळी कामगारांच्या सुरक्षिततेबाबत प्रमाणित कार्यपद्धती निश्चित करण्यात आली असून तिचे पालन करण्यात आले होते का, याची शहानिशा करण्यात येईल.
तसेच, वस्तुस्थिती तपासली जाईल. नियमभंग 3 करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले.
तटस्थ पक्षाकडून सुरक्षेची पडताळणी
उंचावरील बांधकामांसाठीची यंत्रणा, क्रेन्स व इतर यंत्रसामग्रीची तटस्थ पक्षाकडून तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
किनारी रस्त्याच्या (वेसावे ते भाईंदर) सर्व पॅकेजमध्ये 'कार्यस्थळ-आधारित सुरक्षा'ची आदर्श प्रणाली अनिवार्यपणे राबविण्यात येईल.
कामगार सुरक्षा पडताळणीसाठी स्वतंत्र तज्ज्ञ संस्थेची नियुक्ती करून त्यांच्या माध्यमातून सुरक्षा प्रोटोकॉलची सखोल, सर्वकष व पुनर्तपासणी सुनिश्चित करण्यात येईल; कोणतीही त्रुटी आढळल्यास तत्काळ दुरुस्तीची कार्यवाही करण्यात येईल, असेही सांगण्यात आले.