होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2026 06:40 IST2026-05-03T06:38:52+5:302026-05-03T06:40:02+5:30
होर्मुझ हे आंतरराष्ट्रीय जलव्यापार क्षेत्रातील एक मुख्य 'चोकपॉईंट' (कोंडीचे ठिकाण) मानले जाते. सामान्यतः येथून दररोज सुमारे २० दशलक्ष बॅरल कच्चे तेल, पेट्रोलियम उत्पादने, तसेच जगातील एकूण एलएनजी निर्यातीचा पाचवा हिस्सा वाहून नेला जातो.

होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
होर्मुझ हे आंतरराष्ट्रीय जलव्यापार क्षेत्रातील एक मुख्य 'चोकपॉईंट' (कोंडीचे ठिकाण) मानले जाते. सामान्यतः येथून दररोज सुमारे २० दशलक्ष बॅरल कच्चे तेल, पेट्रोलियम उत्पादने, तसेच जगातील एकूण एलएनजी निर्यातीचा पाचवा हिस्सा वाहून नेला जातो. जगातील एक तृतीयांश हेलिअम व खतासाठी वापरले जाणारे तेवढेच युरियादेखील याच मार्गावरून जाते. होर्मुझला पर्याय शोधण्याचे प्रकल्प अनेक दशकांपासून कागदावर आहेत, मात्र आता पहिल्यांदाच या पर्यायांची खरी कसोटी लागत आहे.
सौदी अरेबियाची 'पेट्रोलाइन'
सौदी अरेबिया सध्या जगातील सर्वात महत्त्वाची पाइपलाइन सौदी अरेबियातून जाणारी 'ईस्ट-वेस्ट पाइपलाइन' (ज्याला 'पेट्रोलाइन' असेही म्हणतात) ही आहे. १९८० च्या दशकात मूळ 'टँकर युद्धा' (इराक-इराण युद्धात तेल टँकरवर हल्ले केले जात असत) दरम्यान ही बांधली गेली होती. २०१९ मध्ये याची क्षमता ७ दशलक्ष बॅरलपर्यंत होती.
मर्यादा : सौदी अरेबियाला लागून लाल समुद्रावरील यानबू या ठिकाणी लोडिंग टर्मिनल्स वेगाने तेल वाहून नेण्यासाठी तयार केलेले नाहीत. त्यामुळे सध्या या पाइपलाइनमधून तिच्या क्षमतेपेक्षा कमी तेलवाहतूक सुरू आहे.
युरोपचा प्रश्न : यानबूहून युरोपला जाणारे तेल इजिप्तमधील सुमेद पाइपलाइनमधून जावे लागते, ज्याची क्षमता २.५ दशलक्ष बॅरल प्रतिदिन आहे.
सं. अरब अमिरातीची 'अॅडकॉप'
यूएई दुसरा महत्त्वाचा पर्याय अबु धाबीची कच्चे तेल वाहून नेणारी पाइपलाइन आहे, जी हबशान ते फुजैराह
(ओमानच्या आखाताजवळ) जाते.
वैशिष्ट्य : आखाती देशांतून थेट हिंदी महासागरात बाहेर पडणारा हा एकमेव मार्ग आहे.
धोका : इराणने मार्च महिन्यात फुजैराहवर ड्रोन हल्ले करून येथील साठवणूक टाक्यांना लक्ष्य केले होते, ज्यामुळे लोडिंग थांबवावे लागले.
इराक : युद्धापूर्वी इराकचे ३.४ दशलक्ष बॅरल तेल प्रामुख्याने बसरा बंदर आणि होर्मुझमधून जात असे. उत्तरेकडील तुर्कीयेला जोडणारी पाइपलाइन सप्टेंबर २०२५ मध्ये पुन्हा सुरू झाली असली, तरी त्यातून होणारी वाहतूक इराकच्या एकूण नुकसानीच्या तुलनेत नगण्य आहे.
कुवेत : यांची अवस्था सर्वात वाईट आहे. त्यांचे दररोजचे २ दशलक्ष बॅरल तेल केवळ होर्मुझमधूनच जाते. कुवेतकडे कोणताही पाइपलाइन पर्याय नाही. कुवेत पेट्रोलियम कॉर्पोरशनने एप्रिलमध्ये सांगितले की, होर्मुझ मार्ग उघडला तरी तातडीने ते पुरवठा करू शकणार नाहीत.
कतार : कतारची मुख्य ताकद एलएनजी आहे. जगाला १९% एलएनजी पुरवणारा कतार पूर्णपणे होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अवलंबून आहे.
इराणचा स्वतःचा पर्याय : विशेष म्हणजे, इराणने स्वतःसाठी १००० किमी लांबीची पाइपलाइन (गोरेह ते जास्क) बांधली आहे. मात्र, निर्बंध आणि अपूर्ण कामामुळे ती केवळ नावापुरतीच सुरू आहे.
निष्कर्ष : आखातात अधिक पाइपलाइन असाव्यात ही मागणी समजण्यासारखी आहे, पण होर्मुझला पर्याय उभा करण्यासाठी शेकडो अब्ज डॉलर व दशकांचा वेळ लागेल. शिवाय, नव्या पाइपलाइन आणि टर्मिनल्सदेखील ड्रोन हल्ल्यांपासून सुरक्षित असतीलच याची कसलीही शाश्वती नाही.