छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2026 06:09 IST2026-05-03T06:09:19+5:302026-05-03T06:09:54+5:30
शरणागत माओवाद्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बस्तरच्या घनदाट जंगलात पेरून ठेवलेली स्फोटके नष्ट करण्यासाठी जिल्हा पोलिस आणि 'डीआरजी'च्या जवानांची एक विशेष तुकडी छोटेबेठिया ठाण्याच्या हद्दीत 'डी-मायनिंग' मोहीम राबवत होती.

छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
गडचिरोली : छत्तीसगड राज्य माओवादमुक्त झाल्याच्या अधिकृत घोषणेला काही दिवस उलटत नाहीत तोच, माओवाद्यांनी पेरलेले आयईडी निकामी करताना झालेल्या स्फोटात डीआरजीच्या (जिल्हा राखीव दल) चार जवानांनी प्राण गमावले, छत्तीसगडच्या कांकेर-नारायणपूर सीमावर्ती भागात २ मे रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास ही घटना घडली.
शरणागत माओवाद्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बस्तरच्या घनदाट जंगलात पेरून ठेवलेली स्फोटके नष्ट करण्यासाठी जिल्हा पोलिस आणि 'डीआरजी'च्या जवानांची एक विशेष तुकडी छोटेबेठिया ठाण्याच्या हद्दीत 'डी-मायनिंग' मोहीम राबवत होती. ही तुकडी मानक प्रक्रियेनुसार स्फोटके हाताळत होती. या घटनेच्या चौकशीचे आदेश राज्य सरकारने दिले असून फॉरेन्सिक टीमकडून तांत्रिक तपासणी केली जात आहे.
कानठळ्या बसणारा स्फोटांचा आवाज
जवानांची तुकडी स्फोटके शोधत असतानाच एका जिवंत भूसुरुंगाचा भीषण स्फोट झाला. हा स्फोट इतका जबरदस्त होता की, परिसरात कानठळ्या बसणारा मोठा आवाज झाला. यामध्ये चार जवान गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ हेलिकॉप्टरच्या साहाय्याने रुग्णालयात हलवण्यात आले.
मात्र, दुर्दैवाने उपचारादरम्यान डीआरजी प्रभारी सुखराम वट्टी, कृष्णा कोमरा, संजय गढपाले, परमानंद कोमरा हे चारही जवान शहीद झाले. तीन जवान कांकेर जिल्ह्यातील होते तर सुखराम वट्टी हे विजापूर जिल्ह्यातील रहिवासी होते. माओवादी हिंसाचार थंडावत असल्याचे चित्र असताना, अशा स्फोटांमुळे यंत्रणा पुन्हा एकदा 'हाय अलर्ट'वर आहेत.