ढगांनी राेखला सूर्याचा काेप; नागपूरसह 'या' शहरांमध्ये उष्णतेची लाट
By निशांत वानखेडे | Updated: April 20, 2026 20:03 IST2026-04-20T20:02:32+5:302026-04-20T20:03:56+5:30
Nagpur : गेले दहा दिवस उन्हाच्या तीव्र चटक्यांनी छळलेल्या वैदर्भीयांना अखेर साेमवारी काही अंशी दिलासा मिळाला. आकाशात जमलेल्या ढगांनी सूर्याची प्रखरता ढगातच राेखली. त्यामुळे बहुतेक शहरांचे तापमान १ ते २ अंशाने घटले.

Clouds block the sun's rays; Heat wave in these cities including Nagpur
नागपूर : गेले दहा दिवस उन्हाच्या तीव्र चटक्यांनी छळलेल्या वैदर्भीयांना अखेर साेमवारी काही अंशी दिलासा मिळाला. आकाशात जमलेल्या ढगांनी सूर्याची प्रखरता ढगातच राेखली. त्यामुळे बहुतेक शहरांचे तापमान १ ते २ अंशाने घटले. चटके कमी जाणवले पण उकाडा मात्र कायम हाेता. पुढचे चार दिवस वादळासह अवकाळीचे सावट असले तरी नागपूरसह काही शहरातील नागरिकांना उष्ण लाटेचाही सामना करावा लागेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
रविवारी ४४.४ अंशाच्या यंदाच्या उच्चांकीवर गेलेल्या नागपुरात साेमवारची सकाळ ढगांचा गारवा घेऊन उजाळली. सकाळपासून आकाश ढगांनी व्यापले हाेते. दुपारी ढगांचा अडथळा काहीसा हटला पण उन्हाची तीव्रता कमी हाेती. सायंकाळी पुन्हा ढगांची गर्दी जमली. त्यामुळे दिवसाचे तापमान २ अंशाने खाली घसरत ४२.४ अंशावर पाेहचले. पारा घटला पण उकाडा मात्र छळत राहिला.
दरम्यान रविवारी देशात सर्वात हाॅट असलेल्या वर्ध्याचा पारा २.५ अंशाने घसरून ४२.५ अंशावर आणि अकाेल्याचे तापमान १.८ अंशाने घटून ४३.२ अंशावर खाली आले. अमरावतीचा पारा घसरला पण विदर्भात सर्वाधिक ४३.४ अंशाची नाेंद झाली. भंडारा ४३ अंशावर आहे. चंद्रपूर, गडचिराेली, वाशिम, यवतमाळचा पारा ४२ अंशाच्या खाली नाेंदविला गेला. हवामान विभागाने पुढचे दाेन दिवस वादळ व विजांसह हलका पाऊस हाेईल, असा अंदाज वर्तवला आहे. मात्र त्याचा दिलासा विदर्भाला मिळण्याची शक्यता कमीच आहे.
नागपूरसह या शहरांमध्ये उष्णतेची लाट
आकाशात अवकाळीचे ढग जमा झाले असले तरी चंद्रपूर व गाेंदिया वगळता इतर शहरांना त्याचा लाभ विदर्भाला नाही. महाराष्ट्रात तापमान २ ते ३ अंशाने घसरेल पण विदर्भातील शहरांना या काळात उष्ण लाटेचा सामना करावा लागेल. विशेषत: नागपूर, अकाेला आणि अमरावतीत कमाल तापमान ४५ अंशापर्यंत जाण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. याशिवाय भंडारा, गडचिराेली, वर्धा, वाशिम, यवतमाळ शहरात पारा ४३ ते ४४ अंशापर्यंत राहिल.
रात्र पण उष्ण
२१ ते २४ तारखेपर्यंत दिवसा उष्णतेच्या लाटा आणि बहुतेक शहरांमध्ये रात्रीही उष्ण राहण्याचा अंदाज आहे. त्यानंतरही दिवस-रात्रीचा ताप कायम राहणार आहे.