नागपुरातील धामणगाव आगीत बाधितांना तातडीची मदत करणार, चंद्रशेखर बावनकुळे
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2026 20:11 IST2026-05-03T20:09:33+5:302026-05-03T20:11:44+5:30
सीएसआर फंडातूनदेखील निधी उभारणार...

नागपुरातील धामणगाव आगीत बाधितांना तातडीची मदत करणार, चंद्रशेखर बावनकुळे
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील धामणगाव तेथील आगीत घर गमावलेल्या बाधितांना तातडीची मदत दिली जाणार आहे. घरबांधणीसाठी खनिकर्म महामंडळामार्फत प्रत्येकी अडीच लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच मुख्यमंत्री सहायता निधीतून अतिरिक्त मदतीसाठी उद्या प्रस्ताव सादर केला जाणार आहे. कोराडी महालक्ष्मी जगदंबा संस्थेमार्फत २० लाख रुपयांची मदत देण्यात येत असून त्यापैकी काही रक्कम सोमवारपर्यंत बाधितांपर्यंत पोहोचवली जाणार असल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. नकुळे यांनी रविवारी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली.
नुकसानीच्या प्रमाणानुसार बाधितांना आर्थिक मदत देण्याचेही नियोजन करण्यात आले आहे. ज्यांचे १०० टक्के नुकसान झाले आहे त्यांना १ लाख रुपये, ७५ टक्के नुकसान झालेल्यांना ७५ हजार रुपये, तर ५० टक्के नुकसान झालेल्यांना ५० हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. याशिवाय शासनाकडून तातडीने २३ हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला असून घरबांधणीसाठी मोफत रेतीही उपलब्ध करून दिली जाणार आहे. आगीत कागदपत्रे जळालेल्या नागरिकांसाठी विशेष शिबिर आयोजित करून आवश्यक कागदपत्रे पुन्हा तयार करून देण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना सायकली व शैक्षणिक साहित्य, तसेच जळालेले वीज मीटर आणि गॅस सिलिंडर पुनर्प्रदान करण्याची कार्यवाही सुरू आहे. राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या माध्यमातून स्वयंपाकघरातील भांड्यांचे संच देण्यात आले असून महिनाभराचे अन्नधान्यही पुरवण्यात आले आहे. घरांचे पुनर्बांधकाम पूर्ण होईपर्यंत बाधित कुटुंबांच्या निवासाची तात्पुरती व्यवस्था शासनाकडून केली जाणार आहे. काही नागरिकांचे गोठेही जळाले असून त्यासाठीही अनुदान देण्याची प्रक्रिया सुरू आहे. ज्या जनावरांचा मृत्यू झाला आहे, त्या कुटुंबांना पर्यायी जनावरे देण्याची योजना राबवण्यात येणार आहे. उमरेड एमआयडीसी परिसरातील ४० ते ५० कंपन्यांनी एकत्र येऊन सीएसआर निधीतून मदत देण्याचा निर्णय घेतल्याची माहितीही त्यांनी दिली.
शेतकऱ्यामुळे लागली आग
या आगीचे कारण एका शेतकऱ्याने शेतात लावलेल्या वणव्यामुळे असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून संबंधितांवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी राज्यात ‘वणवा बंदी कायदा’ आणण्याचा विचार सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पंधरा दिवसांनंतर पुन्हा धामणगावाला भेट देऊन कामांचा आढावा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नरसापूर प्रकरणाची सुनावणी फास्टट्रॅक न्यायालयात होणार
पुण्यातील नरसापूर अत्याचार व हत्या प्रकरणाची सुनावणी फास्टट्रॅक न्यायालयात होईल. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी भक्कम पुरावे सादर करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘शक्ती कायदा’ संदर्भात सर्व तरतुदी भारतीय न्याय संहितेत समाविष्ट करण्यात आल्याने स्वतंत्र कायद्याची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले.