परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2026 23:18 IST2026-05-03T23:18:16+5:302026-05-03T23:18:41+5:30
आतापर्यंत चार ते पाच दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली असून नुकसानीचा आकडा कोट्यवधींच्या घरात जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
गेल्या अनेक वर्षांपासून आगीच्या विळख्यात अडकणाऱ्या परतवाडा येथील लाकूड बाजारात रविवारी रात्री पुन्हा एकदा भीषण आग लागली. या आगीने पाहता पाहता रौद्र रूप धारण केल्याने लाकूड आणि फर्निचर व्यापाऱ्यांची एकच पळापळ झाली. आतापर्यंत चार ते पाच दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली असून नुकसानीचा आकडा कोट्यवधींच्या घरात जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
रविवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास लागलेली ही आग वाऱ्याच्या वेगामुळे क्षणात पसरली. विशेष म्हणजे, हाकेच्या अंतरावर असलेल्या अचलपूर नगर परिषदेची अग्निशमन गाडी तब्बल अर्धा तास उशिराने पोहोचल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. सध्या नगर परिषदेचा एकमेव बंब आग विझवण्यासाठी 'केविलवाणा' प्रयत्न करत आहे. चांदूर बाजार, अंजनगाव, अमरावती आणि मोर्शी येथून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले असले तरी, उशिरापर्यंत त्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या नव्हत्या.
सुरक्षेच्या कारणास्तव परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात काळोख पसरला असून, नागरिक मोबाईलच्या टॉर्च आणि एका हॉटेलवरून तात्पुरत्या घेतलेल्या फोकसच्या प्रकाशात आग विझवण्याचा आणि दुकानातील माल वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. अचलपूर मार्गावरील वाहतूक पूर्णपणे रोखण्यात आली असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
या लाकूड बाजाराला आतापर्यंत पाचव्यांदा मोठी आग लागली आहे. दरवेळी लाखो-कोट्यवधींचे नुकसान होते, शेजारील रहिवासी वस्तीचा जीव टांगणीला लागतो, मात्र प्रशासनाकडून ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे.