नीट पेपरफूट प्रकरणाचे ‘नागपूर कनेक्शन’, दिल्लीच्या पथकाची नागपूर-चंद्रपूरमध्ये झडती
By योगेश पांडे | Updated: May 19, 2026 13:22 IST2026-05-19T13:20:26+5:302026-05-19T13:22:49+5:30
Nagpur : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट पेपरफूट प्रकरणाच्या तपासात आता विदर्भ कनेक्शन समोर येऊ लागले आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) दिल्ली येथील विशेष पथकाने मंगळवारी नागपूर आणि चंद्रपूर येथे तीन उमेदवारांच्या घरांवर झडती कारवाई केली.

'Nagpur connection' of NEET paperfoot case, Delhi team conducts searches in Nagpur-Chandrapur
योगेश पांडे
नागपूर : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट पेपरफूट प्रकरणाच्या तपासात आता विदर्भ कनेक्शन समोर येऊ लागले आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) दिल्ली येथील विशेष पथकाने मंगळवारी नागपूर आणि चंद्रपूर येथे तीन उमेदवारांच्या घरांवर झडती कारवाई केली. या कारवाईत नागपूर सीबीआय पथकानेही सहकार्य केले. तपास यंत्रणांच्या या हालचालींमुळे विदर्भातील शैक्षणिक वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, झडती घेण्यात आलेल्या तिघांपैकी दोन विद्यार्थी नागपूरमधील असून एक उमेदवार चंद्रपूर जिल्ह्यातील आहे. सीबीआयच्या पथकांनी या विद्यार्थ्यांच्या घरांची व मोबाईलची तपासणी केली. या विद्यार्थ्यांचे नीट परीक्षेदरम्यान काही संशयास्पद संपर्क, आर्थिक व्यवहार आणि परीक्षा प्रक्रियेशी संबंधित डिजिटल पुरावे तपासण्याच्या उद्देशाने ही कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी संबंधित विद्यार्थ्यांच्या निवासस्थानी लॅपटॉप, मोबाईल फोन, काही दस्तऐवज तसेच ऑनलाईन व्यवहारांची माहिती तपासली.
तपास पथकाने विद्यार्थ्यांच्या पालकांशी तसेच काही परिचितांशीही चौकशी केल्याचे समजते. पेपरफूट रॅकेटशी संबंधित दलाल, कोचिंग नेटवर्क किंवा आर्थिक देवाणघेवाणीचा काही संबंध आहे का, याचाही तपास सुरू असल्याची माहिती आहे. काही इलेक्ट्रॉनिक उपकरणे तपासासाठी जप्त करण्यात आल्याचीही माहिती पुढे येत आहे. मात्र अधिकृतरीत्या याबाबत कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही. अद्यापपर्यंत कुणालाही ताब्यात घेण्यात आलेले नाही. मात्र पुढील चौकशीसाठी कुणाला अटक करायची की नाही याचा निर्णय दिल्लीचे पथक घेणार आहे. २०१५ मधील एआयपीएमटीतील घोटाळा व २०२१ मधील ‘नीट’च्या महाघोटाळ्यात नागपुरचा थेट सहभाग होता व मास्टरमाईंड परिमल कोतपल्लीवार नागपुरातच आरएस एज्युकेशन नावाची संस्था चालवत होता व त्याने देशपातळीवर डमी उमेदवारांचे रॅकेट चालविले होते हे विशेष.