सीबीआयची नागपूर-चंद्रपूरमध्ये झडती
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2026 06:11 IST2026-05-20T06:11:20+5:302026-05-20T06:11:29+5:30
अद्याप कुणालाही ताब्यात घेण्यात आलेले नाही. मात्र पुढील चौकशीसाठी कुणाला अटक करायची की नाही याचा निर्णय दिल्लीचे पथक घेणार आहे.

सीबीआयची नागपूर-चंद्रपूरमध्ये झडती
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट पेपरफूट प्रकरणाच्या तपासात आता विदर्भ कनेक्शन समोर येऊ लागले आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) दिल्ली येथील विशेष पथकाने मंगळवारी नागपूर आणि चंद्रपूर येथे तीन उमेदवारांच्या घरांवर झडती कारवाई केली. या कारवाईत नागपूर सीबीआय पथकानेही सहकार्य केले. तपास यंत्रणांच्या या हालचालींमुळे विदर्भातील शैक्षणिक वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. अद्याप कुणालाही ताब्यात घेण्यात आलेले नाही. मात्र पुढील चौकशीसाठी कुणाला अटक करायची की नाही याचा निर्णय दिल्लीचे पथक घेणार आहे.
‘नीट’ प्रकरणात लातुरात बालरोग तज्ज्ञाची चौकशी
लातूर : नीट पेपरफुटीच्या प्रकरणात पी.व्ही. कुलकर्णीच्या संपर्कात असलेल्या बालरोग तज्ज्ञ डॉक्टराची सायंकाळी ५ वाजेपासून सीबीआयचे पथक चौकशी करीत आहे. रात्री पावणे नऊपर्यंत चौकशी सुरूच होती. पेपर ज्यांच्याकडे आला असल्याचा संशय आहे, तसेच ज्यांच्याबद्दलच्या तक्रारी सीबीआयकडे पोहोचल्या आहेत, त्यांचा जबाब घेतला जात आहे. पेपरफूट रॅकेटशी संबंधित दलाल, कोचिंग नेटवर्क किंवा आर्थिक देवाणघेवाणीचा काही संबंध आहे का, याचाही तपास सुरू असल्याची माहिती आहे.
विद्यार्थ्यांच्या घरांची व मोबाइलची तपासणी
मिळालेल्या माहितीनुसार, झडती घेण्यात आलेल्या तिघांपैकी दोन विद्यार्थिनी नागपूरमधील असून एक विद्यार्थी चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथील आहे. सीबीआयच्या पथकांनी या विद्यार्थ्यांच्या घरांची व मोबाइलची तपासणी केली. या विद्यार्थ्यांचे नीट परीक्षेदरम्यान काही संशयास्पद संपर्क, आर्थिक व्यवहार आणि परीक्षा प्रक्रियेशी संबंधित डिजिटल पुरावे तपासण्याच्या उद्देशाने ही कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. सीबीआयने संबंधित विद्यार्थ्यांच्या घरुन लॅपटॉप, मोबाइल फोन, दस्तऐवज तसेच ऑनलाइन व्यवहारांची माहिती तपासली. तपास पथकाने विद्यार्थी, पालक तसेच काही परिचितांशीही चौकशी केल्याचे समजते.