Congress Harshwardhan Sapkal: भाजपा सरकार केंद्रात व अनेक राज्यात आल्यापासून गुन्हेगारीने डोके वर काढले असून शिक्षण क्षेत्रातही धुडगुस सुरू आहे. भाजपा सरकारला एक परीक्षाही सुरळीत पार पाडता येत नाही अशी अवस्था झाली. NEET पेपर फुटल्याने ही परीक्षा रद्द करून पुन्हा घेण्याची नामुष्की ओढवली आहे. गुन्हेगारांना अभय मिळत असल्यानेच पेपर लिक करणारे मोकाट सुटलेत. नीट पेपर लीकप्रकरणी राष्ट्रीय चाचणी संस्थेचे (NTA) महासंचालक अभिषेक सिंह यांची हकालपट्टी करून अटक करा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
यासंदर्भात प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, दिनांक ३ मे रोजी नीटची परीक्षा देशभर पार पडली. वर्षभर अभ्यास करून विद्यार्थ्यांनी परिक्षेला सामोरे जायचे आणि या अत्यंत महत्त्वाच्या परीक्षांचे पेपर लीक होतात हा विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी मांडलेला खेळ आहे. आता पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे. फेर परीक्षेमुळे केवळ २२ लाख विद्यार्थ्यांनाच नाहक त्रास होणार नाही, तर २२ लाख कुटुंबांना त्याचा त्रास होणार आहे. नीट परीक्षा ही अनेक वर्षांची कठोर मेहनत, त्याग, शिस्त आणि डॉक्टर बनण्याच्या स्वप्नाचे प्रतीक आहे. पेपर रद्द होण्याने लाखो विद्यार्थी व त्यांच्या पालकांच्या आशा, आकांशा व स्वप्नांचा चुराडा केलेला आहे, अशी टीका करण्यात आली आहे.
काही फरक पडल्याचे आत्ताच्या पेपरफुटीवरून दिसत नाही
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या कार्यकाळात दुसऱ्यांदा नीट परिक्षेत गडबड झाली आहे. NEET-UG 2024 साली पेपरफुटी झाली होती, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सुरुवातीला पेपर फुटीचे आरोप फेटाळले होते, परंतु नंतर बिहार आणि हजारीबाग येथे गैरप्रकार झाल्याचे मान्य केले होते व दोषींवर कारवाईचे आश्वासनही दिले होते. पण त्यात काही फरक पडल्याचे आत्ताच्या पेपरफुटीवरून दिसत नाही. काँग्रेससह इतर पक्षांचे सरकार असले की, भाजपा मंत्र्याचा राजीनामा मागत असे, पण २०१४ पासून घटना कितीही गंभीर असो भाजपाचा मंत्री राजीनामा दिल्याचे उदाहरण दिसत नाही, असे सपकाळ यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रातही पेपर फुटीचे अनेक प्रकार
महाराष्ट्रातही पेपर फुटीचे अनेक प्रकार झाले, पण त्यावर कठोर कारवाई झाली नाही उलट चुकीच्या बातम्या दिल्या जातात. दि २ मे २०२६ रोजी झालेल्या एसआरपीएफ दौंड शिपाई भरतीच्या लेखी परीक्षेतील १०० पैकी तब्बल ८५ प्रश्न एका खासगी प्रकाशकाच्या पुस्तकातून जसेच्या तसे विचारण्यात आले होते, हा सुद्धा स्पर्धा परिक्षेतील गैरप्रकारच आहे. भाजपा सरकारला परिक्षाही घेता नाहीत हे अकार्यक्षम सरकारचे लक्षण आहे. देशभरातील विद्यार्थी व पालक या अकार्यक्षम व कुचकामी सरकारला माफ करणार नाहीत. काँग्रेस पक्ष नेहमीच जनतेचा आवाज उठवत आला आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी सरकारला जाब विचारण्यासाठी काँग्रेस पक्ष विद्यार्थ्यांसोबत आहे, असेही सपकाळ म्हणाले.
Web Summary : Congress leader Sapkal criticizes the government over NEET paper leak, demanding action against NTA chief. He highlights the distress caused to students and families and accuses the government of failing to conduct fair exams, citing previous instances and lack of accountability.
Web Summary : कांग्रेस नेता सपकाल ने NEET पेपर लीक पर सरकार की आलोचना की और NTA प्रमुख के खिलाफ कार्रवाई की मांग की। उन्होंने छात्रों और परिवारों को हुई परेशानी पर प्रकाश डाला और सरकार पर निष्पक्ष परीक्षा आयोजित करने में विफल रहने का आरोप लगाया, पिछले उदाहरणों और जवाबदेही की कमी का हवाला दिया।