सध्या सोशल मीडियावर १९६७ सालच्या 'द हिंदू' वृत्तपत्राची एक क्लिपिंग व्हायरल होत आहे, ज्यामध्ये "सोनं खरेदी करू नका, इंदिरा गांधींचं जनतेला आवाहन" अशी हेडलाईन दिसत आहे. पंतप्रधान मोदींनी नुकत्याच केलेल्या अशाच एका आवाहनाच्या पार्श्वभूमीवर हे कात्रण मोठ्या प्रमाणात शेअर केलं जात आहे. मात्र, या कात्रणामागचं सत्य आणि इतिहास दोन्ही समजून घेणं गरजेचं आहे.
व्हायरल कात्रण खरं आहे का?
हे व्हायरल होणारं कात्रण बनावट असल्याचं समोर आलंय. ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरुन एक पोस्ट करत यासंदर्भातील माहिती दिलीये. १९६७ चं हे कात्रण AI-जनरेटेड (बनावट) असल्याचा दावा त्यांनी केलाय. सरदेसाई यांनी मूळ फ्रंट पेज आणि १९७३ च्या 'ऑइल शॉक' दरम्यानच्या खऱ्या बातम्यांचे फोटो शेअर करून हा दावा खोडून काढला आहे.
खरोखरच इंदिरा गांधींनी असं आवाहन केलेलं का?
हो, हे ऐतिहासिक सत्य आहे. व्हायरल होत असलेलं कात्रण बनावट असलं तरी, त्यामागील इतिहास खरा आहे. भाजप नेते आर. अशोका यांनी पुष्टी केली की, १९६७ मध्ये इंदिरा गांधींनी आर्थिक शिस्त राखण्यासाठी आणि परकीय चलनाचा साठा वाचवण्यासाठी जनतेला सोनं न खरेदी करण्याचं आवाहन केलं होतं.
ऐतिहासिक संदर्भ काय?
१९६५ च्या पाकिस्तान युद्धाचे परिणाम आणि दुष्काळामुळे भारत त्याकाळी तीव्र मंदीचा सामना करत होता. १९६६ मध्ये भारताचा परकीय चलन साठा अवघ्या तीन आठवड्यांत ६५ टक्क्यांनी घटला होता, ज्यामुळे रुपयाचं ५७ टक्क्यांनी अवमूल्यन करावं लागलं होतं. अशा स्थितीत सोन्याची आयात कमी करणं हे आर्थिकदृष्ट्या योग्य पाऊल होतं.
संकटकाळात अनेकदा सोन्याचा आधार
१९६२ (भारत-चीन युद्ध): पंडित नेहरूंनी संरक्षण निधीसाठी सोनं आणि पैसे दान करण्याचं आवाहन केलं होतं.
१९९१ (आर्थिक संकट): आखाती युद्धामुळे कच्च्या तेलाचे दर वाढले आणि परकीय चलन साठा संपत आला तेव्हा भारताला आपलं सोनं बँक ऑफ इंग्लंड आणि बँक ऑफ जपानकडे गहाण ठेवावं लागलं होतं.
२०१३: तत्कालीन अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी चालू खात्यातील तूट कमी करण्यासाठी भारतीयांना सोनं खरेदीचा मोह टाळण्याचं आवाहन केलं होतं.
राजकीय वाद आणि आरोप-प्रत्यारोप
पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर काँग्रेस आणि 'आप'नं त्यांच्यावर कडक टीका केली आहे. राहुल गांधी यांनी या आवाहनाला 'अपयशाची कबुली' म्हटलं असून, अरविंद केजरीवाल यांनी ही 'आर्थिक आणीबाणीची चाहूल' आहे का असा प्रश्न विचारला आहे. याला प्रत्युत्तर देताना भाजपनं इतिहासाचा दाखला दिला. जेव्हा इंदिरा गांधी किंवा चिदंबरम यांनी असं आवाहन केलं, तेव्हा काँग्रेससाठी ते 'आर्थिक धोरण' होते, पण आता मोदींनी तेच राष्ट्राच्या हितासाठी केल्यावर काँग्रेस त्याला विरोध करत आहे, असं भाजपनं म्हटलं आहे.
१९६७ आणि २०२६ मधील फरक
राजदीप सरदेसाई यांच्या मते, १९६७ आणि आजच्या परिस्थितीत मोठा फरक आहे. १९६७ मध्ये भारताकडे काही आठवड्यांचाच परकीय चलन साठा होता, तर आज भारताकडे ८०० अब्ज डॉलर्सचा प्रचंड परकीय चलन साठा आहे. २०२५-२६ मध्ये भारताची सोन्याची आयात २४ टक्क्यांनी वाढून ६.७७ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे, जो एक चिंतेचा विषय आहे. मात्र, आजची भारतीय अर्थव्यवस्था १९६७ च्या तुलनेत कितीतरी पटीनं अधिक शक्तिशाली आहे.
Web Summary : A 1967 newspaper clipping claiming Indira Gandhi urged people not to buy gold went viral. While the clipping is fake, the appeal was real due to India's economic crisis. Despite current strong reserves, rising gold imports remain a concern.
Web Summary : इंदिरा गांधी द्वारा सोना न खरीदने का आग्रह करने वाली 1967 की अखबार की कटिंग वायरल हुई। कटिंग नकली है, लेकिन भारत के आर्थिक संकट के कारण अपील वास्तविक थी। मजबूत भंडार के बावजूद, बढ़ते सोने के आयात चिंता का विषय हैं।