शासनच म्हणते, ओरडू नका..आता विद्यार्थीच डाफरू लागले शिक्षकांवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 17:31 IST2026-03-19T17:31:09+5:302026-03-19T17:31:36+5:30
लोकमतच्या बातमीनंतर शिक्षकांनी मांडली कैफियत

शासनच म्हणते, ओरडू नका..आता विद्यार्थीच डाफरू लागले शिक्षकांवर
आदित्य वेल्हाळ
कोल्हापूर : कधीकाळी भारतातल्या गुरुकुल पद्धतीने जगाच्या शैक्षणिक व्यवस्थेला भुरळ पाडली. मात्र, या सुवर्ण इतिहासाची सोनेरी पानं मागे पडून शिक्षक-विद्यार्थ्यांच्या नात्यातच प्रचंड मोठी दरी पडली. याला सर्वस्वी सरकारचे धोरण असून या धोरणामुळेच विद्यार्थी चक्क शिक्षकांवरच डाफरू लागल्याची खंत जिल्ह्यातील शिक्षकांनी केली.
कसबा बावड्यातील एका शाळेत ' मुख्याध्यापिकेला वर्गात विद्यार्थिनीची शिवीगाळ' ही बातमी लोकमतमध्ये १८ मार्चला प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्हाभरातील अनेक शिक्षकांनी लोकमतच्या प्रतिनिधीशी संपर्क साधत सरकारचे धोरणच याला कारणीभूत असल्याची कैफियत मांडली. विद्यार्थ्यांना रागवू नका, ओरडू नका अशा सूचना शिक्षण विभागाकडून दिल्या जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांवर संस्कार कसे करणार असा सवाल शिक्षकांनी उपस्थित केला आहे.
शाळांमध्ये शिक्षणच नव्हे तर संस्कारही दिले जातात. हे देताना अनेकदा शिक्षकांना कठोर भूमिका घ्यावी लागते. मात्र, आपल्या पाल्याला शिक्षक काही बोलले तर ते अनेक पालकांना रुचत नाही. त्यातूनच विद्यार्थी अति लाडावून शिक्षकांना वादग्रस्त बोलण्यापर्यंत त्यांची मजल जाते. याला सर्वस्वी पालक जबाबदार आहेत. शिक्षणामधील आपली गुरुकुल व्यवस्था जगात आदर्श होती. मात्र, अशा घटनांमुळे गुरू-शिष्याच्या नात्यामधील पवित्रता यातून नष्ट होत आहे हे दुर्दैवी आहे. -डॉ. श्वेता चौगुले-निर्मळे, प्राचार्य, अशोकराव माने बी. एड. कॉलेज पेठवडगाव.
शिक्षकांना सर्व विद्यार्थी सारखेच असतात. पण, विद्यार्थ्यांनी त्यांची मर्यादा ओळखली पाहिजे. पालक, शिक्षक व विद्यार्थी या त्रिकुटातूनच संस्कारक्षम विद्यार्थी तयार होतात. आपला विद्यार्थी कसा वागतो याची जबाबदारी शिक्षकांबरोबर पालकांचीही आहे. -पद्मिनी कापसे, माजी मुख्याध्यापिका, कोल्हापूर.
शाळेत असताना विद्यार्थ्यांनी संस्कारानुसारच वागले पाहिजे, पालकांनी पाल्यांचे अतिलाड थांबवायला हवेत. शासनाच्या अध्यादेशानुसार विद्यार्थ्यांना मारहाण किंवा बोलणेही कायदेशीर गुन्हा आहे. मात्र, याचा अर्थ वेगळा घेतला जात असल्याने शिक्षकांसमोर अडचणी निर्माण होतात. त्यामुळे असे प्रकार वाढत आहेत. -रवींद्र मोरे, उपाध्यक्ष, जिल्हा मुख्याध्यापक संघ, कोल्हापूर.
शासनाच्या धोरणामुळे विद्यार्थ्यांना रागावणेही मुश्कील झाले आहे. मात्र, याचा फायदा विद्यार्थी व पालकही घेतात. आता विद्यार्थ्यांना ओरडण्याचीही भीती वाटते. सर्व विद्यार्थ्यांसमोर पालकच शिक्षकांना सॉरी म्हणायला लावतात याच्यासारखं दुसरं दुर्दैव नाही. -सीमा सूर्यवंशी, शिक्षक, इंदुमती हायस्कूल, कोल्हापूर.