Kolhapur News: लवकरच येते बाळा.. असे व्हिडिओ कॉल करून सांगणाऱ्या आईला उपचारादरम्यान मृत्यूने गाठले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 12:16 IST2026-01-03T12:15:36+5:302026-01-03T12:16:08+5:30
आई आल्यावर वाढदिवस साजरा करण्याचे 'अंतरा'चे स्वप्न अधुरे

Kolhapur News: लवकरच येते बाळा.. असे व्हिडिओ कॉल करून सांगणाऱ्या आईला उपचारादरम्यान मृत्यूने गाठले
कोल्हापूर : असंडोली (ता. गगनबावडा) येथील गर्भवती रूपाली अमित कांबळे (२७) यांचा शुक्रवारी सीपीआरमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी रूपाली यांनी व्हिडिओ कॉलद्वारे गुरुवारी (दि. १) आपल्या मुली आर्वी (७) व अंतरा (३) यांच्याशी संवाद साधला होता. ‘आई, तू कधी येणार’, असा निरागस प्रश्न अंतरा हिने विचारल्यावर ‘लवकरच येते, बाळा’ असे उत्तर देणारी आई या दोन चिमुकल्यांना सोडून कायमची निघून गेली. याबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.
रूपाली यांचे अर्भक १३ डिसेंबरला पोटातच मयत झाले होते. सीपीआरमध्ये सिझेरिअन करून तिच्यावर उपचार सुरू होते. शुक्रवारी तिचाही मृत्यू झाला. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे. पहिल्यांदा बाळ आणि त्यानंतर मातेचाही मृत्यू झाल्याने कांबळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. रूपाली यांचा विवाह असंडोली येथील अमित आनंदा कांबळे यांच्याशी २९ मे २०१७ रोजी झाला होता.
पाचवी गर्भधारणा असलेल्या रूपाली यांना यापूर्वी दोन वेळा नैसर्गिक गर्भपाताचा सामना करावा लागला होता तशी गावातील उपकेंद्रात नोंद झाली आहे. १३ डिसेंबरला मध्यरात्री २ वाजता प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तीव्र रक्तस्त्राव व संसर्गामुळे किडनीवर दाब येऊन डायलिसिस करावे लागले होते. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र अखेर शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पती अमित, आर्वी (७) व अंतरा (३) या दोन चिमुकल्या मुली आहेत.
वाढदिवसाचे स्वप्न अधुरे....
चिमुकली अंतरा हिचा २९ डिसेंबरला वाढदिवस होता. आई घरी नसल्याने वाढदिवस साजरा करता आला नाही. आई आल्यावर वाढदिवस साजरा करण्याचे अंतराचे स्वप्न मात्र कायमचे अपूर्ण राहिले.