Kolhapur: चंदगडमध्ये माडवळे परिसरात दिवसाढवळ्या दिसला ब्लॅक पँथर, कारचालकाने हॉर्न वाजविताच झुडपात घेतली धाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 12:49 IST2026-01-03T12:48:37+5:302026-01-03T12:49:00+5:30
थरारक प्रसंगाचे चित्रीकरण बिर्जे यांनी आपल्या मोबाइलमध्ये केले

Kolhapur: चंदगडमध्ये माडवळे परिसरात दिवसाढवळ्या दिसला ब्लॅक पँथर, कारचालकाने हॉर्न वाजविताच झुडपात घेतली धाव
चंदगड : बिबट्या, टस्कर, अस्वलानंतर तुडये-तुर्केवाडी दरम्यानच्या हाजगोळी हद्दीतील माडवळे कोंड परिसरात ब्लॅक पँथरचे दर्शन झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
गुरुवारी सायंकाळी सुमारे पाचच्या सुमारास विनायक बिर्जे हे कारमधून तुडयेहून चंदगडकडे जात असताना त्यांच्या वाहनासमोर अचानक ब्लॅक पँथर आला. त्यांनी तत्काळ कार थांबवली. रस्त्यावरून तो बाजूला जावा म्हणून हॉर्न वाजवताच पँथरने जवळच्या झुडपात धाव घेतली. या थरारक प्रसंगाचे चित्रीकरण बिर्जे यांनी आपल्या मोबाइलमध्ये केले आहे.
याची माहिती त्यांनी तत्काळ हाजगोळी येथील सामाजिक कार्यकर्ते विनायक पवार तसेच वनविभागाला कळवली. घटनेची दखल घेत वनविभागाने परिसरात सतर्कता वाढवली असून, नागरिकांनी रात्रीच्या वेळी प्रवास करताना खबरदारी घ्यावी, तसेच जंगलालगतच्या भागात एकटे जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
ब्लॅक पँथरच्या दर्शनामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून वनविभागाने लवकरात लवकर शोधमोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.