'दोरखंड टाकून अंबडची वाळू गेवराईत!' तहसीलदारांच्या धडक मोहीमेत १५ माफियांची नावे उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 20:16 IST2026-05-06T20:14:57+5:302026-05-06T20:16:38+5:30

वाळू माफियांनो सावधान! अंबड तहसीलदारांची २४ तास नजर; गेवराईतील १५ बड्या तस्करांविरुद्ध गोंदी पोलिसांत गुन्हा.

Ambad Administration Cracks Down on Sand Mafia; Cases Filed Against 15 Kingpins from  Gevrai | 'दोरखंड टाकून अंबडची वाळू गेवराईत!' तहसीलदारांच्या धडक मोहीमेत १५ माफियांची नावे उघड

'दोरखंड टाकून अंबडची वाळू गेवराईत!' तहसीलदारांच्या धडक मोहीमेत १५ माफियांची नावे उघड

वडीगोद्री/अंबड: अंबड तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातून 'केणी' आणि दोरखंडांच्या साहाय्याने अवैध वाळू उपसा करणाऱ्या गेवराई तालुक्यातील १५ मुख्य वाळू माफियांवर गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नदीपात्रात पाणी असल्याचा फायदा घेऊन बीड जिल्ह्याच्या हद्दीतून लांबवर दोरखंड टाकून अंबडच्या हद्दीतील वाळू ओढून नेली जात असल्याचे प्रशासकीय तपासात निष्पन्न झाले आहे.

अशी चालायची चोरी
गेवराई तालुक्यातील तस्कर नदीत पाणी असल्याने महसूल पथक पोहोचू शकणार नाही, असा विचार करून मोठ्या प्रमाणावर वाळू चोरी करत होते. १८ ते २२ एप्रिल दरम्यान प्रशासनाने अनेकदा धाडी टाकून केण्यांचे दोरखंड कापून जाळून नष्ट केले होते. मात्र, तरीही तस्करांनी जेसीबी, पोकलेन आणि हायवा लावून शासकीय मालमत्तेची लूट सुरूच ठेवल्याने अखेर कडक पाऊले उचलण्यात आली आहेत.

मुख्य आरोपींची नावे
तहसीलदार विजय चव्हाण यांच्या सूचनेनुसार तलाठी पथकाने गोपनीय माहिती गोळा केली, ज्यातून खालील आरोपी निष्पन्न झाले आहेत:
-माळस पिंपळगाव (ता. गेवराई): हरी रघुनाथ सुखदेव, अंकुश पवार, वैभव डाके, शिवाजी पंडित डाके, रमेश सुखदेव, राजेंद्र बाबुराव डाके, किरण डाके, अशोक सुखदेव, रवी टेकाळे, पवन पठाडे, अजय पठाडे आणि प्रवीण राऊत.
-सावळेश्वर (ता. गेवराई): बंटी उदे आणि मुकेश कुटे.
-भांबेरी (ता. अंबड): शाहरुख अनवर शेख.
-याशिवाय राक्षसभुवन व सुरळेगाव येथील त्यांचे इतर साथीदारही या गुन्ह्यात सामील आहेत.

ही कारवाई जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ आणि उपविभागीय दंडाधिकारी उमाकांत पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. या माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी सविस्तर अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला आहे.

कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल
"पर्यावरणाचा ऱ्हास आणि शासकीय मालमत्तेची संघटित चोरी करणाऱ्यांना कोणताही थारा दिला जाणार नाही. गुन्हे दाखल केल्यानंतरही तस्करांच्या वर्तनात बदल झाला नाही, तर यापेक्षाही अत्यंत कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. आमची पथके २४ तास पाळत ठेवून आहेत."
— विजय चव्हाण, तहसीलदार, अंबड.

Web Title: Ambad Administration Cracks Down on Sand Mafia; Cases Filed Against 15 Kingpins from  Gevrai