आखाती देशांमधील तणावासंदर्भात आतापर्यंत कधीही समोर न आलेली एक अत्यंत धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. एप्रिल २०२६ च्या सुरुवातीला संयुक्त अरब अमीरातीने (UAE) इराणविरोधात एक गुप्त लष्करी मोहीम राबवली होती. यानंतर आता सौदी अरेबियानेही इराणवर थेट हल्ले केल्याचे समोर आले आहे.
यासंदर्भात, रॉयटर्सने इराणी आणि पाश्चात्य अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, मार्चच्या अखेरीस सौदी हवाई दलाने इराणवर अनेक भीषण हल्ले चढवले होते. विशेष म्हणजे, आजवर या हल्ल्यांसंदर्भात कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. महत्वाचे म्हणजे, इराणकडून सौदी अरबवर झालेल्या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी रियाधने हे पाऊल उचलले होते.
सौदी अरेबियाने इराणवर थेट हल्ला करण्याची ही पहिलीच वेळ -
महत्वाचे म्हणजे, सौदी अरेबियाने इराणवर थेट हल्ला करण्याची ही पहिलीच वेळ आह. यावरून आता रियाध स्वतःच्या रक्षणासाठी अधिक धैर्य आणि सामर्थ्य दाखवत असल्याचे दिसून येते. मात्र, हे हल्ले नेमके कुठे झाले, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. तसेच, यासंदर्भात सौदी आणि इराणच्या परराष्ट्र मंत्रालयांनीही अद्याप अधिकृत भाष्य केलेले नाही.
सौदीने हे हल्ले करण्यापूर्वी तेहरानला पूर्वकल्पनाही दिली होती -
या नव्या माहितीवरून पश्चिम आशियातील संघर्षाची व्याप्ती स्पष्ट होते. या हल्ल्यानंतर दोन्ही देशांनी एकमेकांशी संपर्कात साधला आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये, यासाठी प्रयत्न करण्यात आले. विशेष म्हणजे, सौदीने हे हल्ले करण्यापूर्वी तेहरानला पूर्वकल्पनाही दिली होती. एवढेच नाही तर, यानंतर झालेल्या चर्चेत सौदीने भविष्यातही अशाच पद्धतीचे प्रत्युत्तराचा दिले जाईल, असा इशाराही दिला होता. शेवटी, अमेरिका आणि इराण यांच्यात ७ एप्रिल रोजी युद्धविराम झाल्यानंतर हा तणावही निवळला.