उन्हाळ्यात छोट्या छोट्या गोष्टींवर राग का येतो, चिडचिड का होते? पाहा काय असतं ‘Summer Anger’ मागचं सायन्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 12:49 IST2026-05-07T12:48:14+5:302026-05-07T12:49:09+5:30
Summer Anger : एक्सपर्ट सांगतात की, वाढतं तापमान केवळ शरीरालाच थकवत नाही, तर मानसिक आरोग्य आणि भावनिक संतुलनावरही परिणाम करतं.

उन्हाळ्यात छोट्या छोट्या गोष्टींवर राग का येतो, चिडचिड का होते? पाहा काय असतं ‘Summer Anger’ मागचं सायन्स
Summer Anger : उन्हाळ्याची चाहूल लागली की फक्त जमीनच तापत नाही, तर लोकांचीही खूप चिडचिड वाढते. भर दुपारी ट्रॅफिक जॅममध्ये अडकल्यावर किंवा एखाद्या छोट्याशा गोष्टीवरही जास्त राग का येतो, बडबड केली जाते. पण असं का होतं याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? याबाबत एक्सपर्ट सांगतात की, वाढतं तापमान केवळ शरीरालाच थकवत नाही, तर मानसिक आरोग्य आणि भावनिक संतुलनावरही परिणाम करतं. अशात उन्हाळ्यात चिडचिड आणि राग वाढण्यामागची कारणे आणि त्यापासून बचावाचे उपाय जाणून घेऊया.
शरीर आणि मेंदूवर वाढणारा ताण
बाहेरील तापमान वाढलं की शरीर स्वतःला थंड ठेवण्यासाठी अधिक मेहनत करू लागतं. हृदयाचे ठोके वाढतात आणि घाम जास्त येऊ लागतो. त्यामुळे शरीर थकतं आणि त्याचा थेट परिणाम मेंदूवर होतो. यामुळे स्ट्रेस वाढतो आणि छोट्या-छोट्या गोष्टींवरही पटकन राग येऊ लागतो.
डिहायड्रेशन आणि मूड स्विंग्स
घामामुळे शरीरातून केवळ पाणीच नाही, तर आवश्यक इलेक्ट्रोलाइट्सही बाहेर पडतात. अगदी हलके डिहायड्रेशनही डोकेदुखी, थकवा आणि एकाग्रता कमी होण्याचं कारण ठरू शकतं. मेंदूला पुरेसं हायड्रेशन न मिळाल्यास मूड स्विंग्स होणे स्वाभाविक आहे. अशावेळी गर्दी, ट्रॅफिक किंवा कामाचा ताण असल्यास चिडचिड आणखी वाढते.
झोपेवर परिणाम
उन्हाळ्यातील उकाड्याच्या रात्रीमुळे झोपेची गुणवत्ता खराब होते. उष्णता आणि अस्वस्थतेमुळे झोप पूर्ण होत नाही आणि त्यामुळे मेंदूचं भावनांवर नियंत्रण ठेवण्याचं संतुलन कमी होतं. त्यामुळे छोट्या गोष्टींवरही चिडचिड वाढू लागते.
मुलं आणि ज्येष्ठांवर अधिक परिणाम
कडक उन्हाचा परिणाम प्रत्येक वयोगटावर वेगळ्या प्रकारे दिसतो. मुलं जास्त उष्णतेमध्ये अधिक चिडचिड करतात. तर ज्येष्ठांमध्ये मानसिक थकवा आणि ऊर्जा कमी झाल्याचं जाणवतं.
उन्हाळ्यात मन शांत ठेवण्यासाठी उपाय
पुरेसे पाणी प्या - दिवसातून किमान ३ ते ४ लिटर पाणी प्या. नारळपाणी किंवा लिंबूपाण्यासारखी इलेक्ट्रोलाइट्सयुक्त पेये घ्या.
हलका आहार घ्या - जड आणि मसालेदार पदार्थ शरीरातील उष्णता वाढवतात. हंगामी फळे आणि सॅलडचा आहारात समावेश करा.
कॅफीन कमी करा - चहा आणि कॉफीमुळे शरीर डिहायड्रेट होऊ शकते आणि अस्वस्थता वाढू शकते.
दुपारच्या उन्हापासून दूर राहा - शक्यतो दुपारी १२ ते ४ या वेळेत बाहेर जाणे टाळा.