VIDEO: पोलिसांनी जेसीबी, ट्रॅक्टर आडवे लावले अन् तस्कर जाळ्यात; पाकिस्तानातून आलेले ५ कोटींचे ड्रग्ज जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 13:20 IST2026-05-05T13:04:54+5:302026-05-05T13:20:56+5:30

राजस्थान पोलिसांनी धाडसी कारवाई करत दोन ड्रग्ज तस्करांना अटक केली आहे.

Police Arrest Two Punjab Smugglers on National Highway 911 Heroin Worth 5 Crore and Arms Seized | VIDEO: पोलिसांनी जेसीबी, ट्रॅक्टर आडवे लावले अन् तस्कर जाळ्यात; पाकिस्तानातून आलेले ५ कोटींचे ड्रग्ज जप्त

VIDEO: पोलिसांनी जेसीबी, ट्रॅक्टर आडवे लावले अन् तस्कर जाळ्यात; पाकिस्तानातून आलेले ५ कोटींचे ड्रग्ज जप्त

Rajasthan Crime:राजस्थानच्या श्रीगंगानगर जिल्ह्यात पोलिसांनी सोमवारी एका मोठ्या आंतरराष्ट्रीय तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला. नॅशनल हायवे ९११ वर एखाद्या चित्रपटातील दृश्याप्रमाणे पाठलाग करून समेजा कोठी पोलिसांनी पंजाबमधील दोन तस्करांना बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून सुमारे ५ कोटी रुपये किमतीची हेरॉईन, अफीम आणि विदेशी बनावटीची पिस्तुलं जप्त करण्यात आली आहेत. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जेसीबी आणि ट्रॅक्टर लावून रोखला रस्ता

मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबमधील दोन तस्कर अंमली पदार्थांची खेप घेऊन जात असल्याची बातमी अतिरिक्त पोलीस अधीक्षक रघुवीर शर्मा यांना मिळाली होती. पोलिसांनी सलेमपुरा-बाजूवाला रोडवर नाकाबंदी केली असता, तस्करांनी पळून जाण्याच्या प्रयत्नात एएसआय विनोद कुमार यांच्या बोलेरो गाडीला जोराची धडक दिली.

यानंतर तस्कर समेजा कोठीच्या दिशेने वेगाने पळू लागले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ठाणेदार कृष्ण कुमार यांनी समेजा कोठी रस्त्यावर ट्रॅक्टर-ट्रॉली आणि चक्क जेसीबी आडवे लावून रस्ता पूर्णपणे सील केला. तस्करांनी ही नाकाबंदीही तोडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांची लक्झरी कार आदळली आणि थांबली. त्यानंतर दोन्ही आरोपींनी शेतात पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी त्यांना घेराव घालून अटक केली.

जप्त करण्यात आलेला मुद्देमाल

तपासणीदरम्यान आरोपींच्या बॅगेत आणि कारमध्ये सुमारे १.९३ किलो हेरॉईन सापडले ज्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत ५ कोटी रुपये आहे. तसेच ९९० ग्राम अफीम आणि ५ विदेशी बनावटीची पिस्तुलं आणि ७४ जिवंत काडतुसे सापडली आहेत.

पाकिस्तानी कनेक्शन उघड

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही ड्रग्ज आणि शस्त्रास्त्रांची खेप पाकिस्तानमधून पाठवण्यात आली होती. पंजाबच्या मार्गे ही खेप पुढे पाठवली जाणार होती. अटक करण्यात आलेले आरोपी कुलविंदर सिंह आणि रॉबिन सिंह हे दोघेही पंजाबमधील फाजिल्का येथील रहिवासी आहेत. या कारवाईत कॉन्स्टेबल कालूराम बेनीवाल आणि सूरजभान कडवा यांनी अत्यंत धाडसी भूमिका बजावली.

सूरतगडमध्येही पोलिसांचा दणका

एकीकडे समेजा कोठी पोलिसांनी मोठी कारवाई केली असतानाच, दुसरीकडे सूरतगड सिटी आणि सदर पोलिसांनी स्वतंत्र कारवाई करत दोन जणांना देशी पिस्तुलांसह अटक केली आहे. सुनील कुमार आणि सुखराम अशी या आरोपींची नावे असून त्यांच्यावर आर्म्स ॲक्टनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दरम्यान, राजस्थान आणि पंजाब पोलिसांच्या या संयुक्त मोहिमेमुळे आंतरराष्ट्रीय तस्करांचे धाबे दणाणले आहेत. हे तस्कर नेमक्या कोणाच्या संपर्कात होते आणि ही हत्यारे कोणाला पुरवली जाणार होती, याचा तपास आता पोलीस करत आहेत.

Web Title: Police Arrest Two Punjab Smugglers on National Highway 911 Heroin Worth 5 Crore and Arms Seized