राजस्थानमधील सीकरशी संबंधित NEET २०२६ पेपर लीक प्रकरणात तपास यंत्रणा सतत मोठे खुलासे करत आहेत. तपासात असं समोर आलं आहे की, हे संपूर्ण नेटवर्क हरियाणा, राजस्थान आणि उत्तराखंडपर्यंत पसरलेलं होतं आणि परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिका लाखो रुपयांना विकल्या जात होत्या. या प्रकरणात अनेक आरोपींच्या अटकेनंतर आता तपास यंत्रणा पेपर लीकच्या संपूर्ण सिंडिकेटचा शोध घेत आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुग्राममधील एका डॉक्टराकडून जमवारामगड येथील मांगीलाल बिवाल आणि दिनेश बिवाल या दोन भावांनी २६ आणि २७ एप्रिल रोजी सुमारे ३० लाख रुपयांना NEET चा पेपर खरेदी केला होता. त्यानंतर दिनेश बिवालने हा पेपर आपल्या मुलाला दिला, जो सीकरमध्ये राहून परीक्षेची तयारी करत होता. तपास यंत्रणांचा दावा आहे की, त्यानंतर २९ एप्रिल रोजी हाच पेपर इतर अनेक विद्यार्थी आणि पालकांपर्यंत पोहोचवण्यात आला.
४ मुलांची गेल्या वर्षीच झाली होती निवड
तपासात असंही समोर आलं आहे की, दिनेश बिवालच्या कुटुंबातील चार मुलांची गेल्या वर्षी NEET मध्ये निवड झाली होती. चौकशीदरम्यान आरोपींनी सांगितलं की, त्यांना एक महिना आधीच माहिती मिळाली होती की परीक्षेचा पेपर फुटणार असून तो उपलब्ध करून दिला जाईल. याच विश्वासावर त्यांनी आधीच तयारी करून ठेवली होती.
७०० विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला पेपर
या प्रकरणात आणखी एक मोठा खुलासा डेहराडूनमधून अटक करण्यात आलेल्या राकेश कुमार मंडवारिया याच्याबाबत झाला आहे. तपास यंत्रणांच्या मते, राकेशने ७०० विद्यार्थ्यांपर्यंत पेपर पोहोचवण्याचं काम केलं होतं. सुरुवातीला हा पेपर डिजिटल माध्यमाद्वारे पाठवण्यात आला आणि नंतर त्याच्या प्रिंट काढून विक्री करण्यात आली. आता तपास यंत्रणा त्या विद्यार्थी आणि पालकांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत ज्यांनी पैसे देऊन पेपर मिळवला होता.
सीकर तपास यंत्रणांच्या रडारवर
सीकर, जे देशभरात मेडिकल आणि इंजिनीअरिंग कोचिंगचे मोठं केंद्र म्हणून ओळखलं जातं, ते आता तपास यंत्रणांच्या रडारवर आहे. तपासात असं समोर आलं आहे की, येथील काही विद्यार्थी आणि कोचिंग चालकांनी व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप्स बनवले होते, ज्याद्वारे प्रश्नपत्रिका आणि उत्तरं शेअर केली गेली. यंत्रणा आता या ग्रुप्सचे ॲडमिन आणि सदस्यांचे डिजिटल तपशील तपासत आहेत.
पेपर लीकमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संताप
या प्रकरणात हरियाणातून यश यादव नावाच्या आरोपीलाही अटक करण्यात आली आहे. त्यानेही विद्यार्थ्यांना पेपर विकण्याचं काम केल्याचा आरोप आहे. पोलीस आणि तपास यंत्रणा आता हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत की, पेपर नेमका कसा बाहेर आला आणि यामध्ये कोणाकोणाची भूमिका होती.
पेपर लीकचं प्रकरण समोर आल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. अनेक विद्यार्थी संघटनांनी परीक्षा प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं असून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. याच दरम्यान संपूर्ण नेटवर्कचा पर्दाफाश करण्यासाठी सतत छापे टाकले जात असून चौकशी सुरू असल्याचं तपास यंत्रणांनी सांगितलं आहे.