"आई-वडिलांना सोड तरच..."; हमाली करुन बायकोला शिकवलं, नोकरी मिळताच नवऱ्याला धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2026 14:41 IST2026-05-10T14:40:39+5:302026-05-10T14:41:31+5:30
एका पतीने आपल्या पत्नीला एएनएम (ANM) चा कोर्स करण्यासाठी दिवसरात्र मेहनत केली, मात्र नोकरी मिळताच पत्नीने आता त्याच्यासोबत राहण्यास नकार दिला आहे.

फोटो - nbt
उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पाचवीपर्यंत शिकलेल्या एका पतीने आपल्या पत्नीला एएनएम (ANM) चा कोर्स करण्यासाठी दिवसरात्र मेहनत केली, मात्र नोकरी मिळताच पत्नीने आता त्याच्यासोबत राहण्यास नकार दिला आहे. गोंडा जिल्ह्यातील मोतीगंज पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या चपरतल्ला कौरहे गावातील राजेश कुमार वर्मा याचं २००१ मध्ये रेणू वर्माशी लग्न झालं होतं.
रेणूने एएनएम कोर्स करण्याची इच्छा व्यक्त केली. राजेशने पत्नीच्या शिक्षणासाठी पंजाबला जाऊन लोखंडाच्या गोदामात हमाली केली. आपल्या दोन म्हशी ३५ हजार रुपयांना विकल्या आणि उसाच्या शेतीतून आलेले ६० हजार रुपयेही तिच्या शिक्षणासाठी दिले. राजेशचा असा आरोप आहे की, एएनएमचा कोर्स पूर्ण झाल्यावर रेणूला गोंडा येथील एका रुग्णालयात नोकरी मिळाली.
नातं तोडण्याची धमकी
नोकरी लागताच तिचं वागणं बदललं. आता ती अट घालत आहे की, "जर माझ्यासोबत राहायचं असेल, तर तुझ्या वृद्ध आई-वडिलांना सोडावं लागेल." राजेशचे वडील आजारी आहेत आणि आईला दिसत नाही, त्यामुळे आई-वडिलांना सोडण्यास त्याने नकार दिला आहे. राजेशने असाही दावा केला आहे की, सासरचे लोक आता त्याच्याकडे १० लाख रुपयांची मागणी करत असून तसं न केल्यास नातं तोडण्याची धमकी देत आहेत.
पती आणि सासरे मारहाण करायचे
पत्नी रेणू वर्माने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तिचं म्हणणं आहे की, सासरी तिचा पती आणि सासरे मारहाण करायचे. शिक्षणासाठी पतीने एक रुपयाचीही मदत केली नाही, असा दावा तिने केला आहे. रेनूचे म्हणणं आहे की, तिची नोकरी शहरात आहे, त्यामुळे पतीने तिथे तिच्यासोबत राहावं, परंतु पती तिला गावातच राहण्यासाठी सक्ती करत आहे. तिने पतीवर भाड्याच्या खोलीत येऊन गोंधळ घातल्याचा आरोप करत पोलीस तक्रारही केली आहे.