क्रूरतेचा कळस! सरकारी नोकरीसाठी बायकोनेच केला नवऱ्याचा 'गेम'; दिली १ लाखाची सुपारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 11:52 IST2026-05-06T11:50:58+5:302026-05-06T11:52:13+5:30
एका शिक्षकाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी खळबळजनक खुलासा केला आहे. या हत्या प्रकरणात मृत्यू झालेल्या शिक्षकाची पत्नीच मुख्य सूत्रधार असल्याचं समोर आलं आहे.

क्रूरतेचा कळस! सरकारी नोकरीसाठी बायकोनेच केला नवऱ्याचा 'गेम'; दिली १ लाखाची सुपारी
महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात एका शिक्षकाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी खळबळजनक खुलासा केला आहे. या हत्या प्रकरणात मृत्यू झालेल्या शिक्षकाची पत्नीच मुख्य सूत्रधार असल्याचं समोर आलं आहे. सरकारी नोकरी मिळवण्याच्या लालसेपोटी आणि कौटुंबिक वादातून पत्नीने आपल्या पतीची सुपारी देऊन हत्या घडवून आणली. याप्रकरणी पोलिसांनी दोन महिलांसह चार आरोपींना अटक केली आहे.
भद्रावती पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या घोडपेठ परिसरातील हनुमान मंदिराजवळ ही धक्कादायक घटना घडली. २ मे रोजी सकाळी ४६ वर्षीय शिक्षक रवींद्र कुलमेथे यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी पाहिलं की, मृताच्या गळ्यात प्लास्टिकची पिशवी आणि त्यावर पांढरा दुपट्टा घट्ट बांधलेला होता, ज्यामुळे ही हत्या असल्याचं स्पष्ट झालं.
हत्येचा कट रचल्याची कबुली
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेहाजवळ सापडलेल्या फोनच्या कॉल डिटेल्सवरून मृताची ओळख गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील रहिवासी रवींद्र तुळशीराम कुलमेथे अशी पटली. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये गळा आवळून हत्या झाल्याचं समोर आलं. तपासादरम्यान पोलिसांनी मृताची ४२ वर्षीय पत्नी दीपमाला कुलमेथे हिची चौकशी केली. पोलिसांनी खाक्या दाखवताच तिने हत्येचा कट रचल्याची कबुली दिली.
१ लाखाची दिली सुपारी
पोलीस तपासात समोर आलं की, दीपमाला तिच्या पतीकडून होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळली होती. नागपुरात उपचारादरम्यान तिची भेट वर्षा परचाके नावाच्या महिलेशी झाली, जिने तिला पतीच्या हत्येचा सल्ला दिला. त्यानंतर दीपमालाने वर्षा परचाके, सोनू उर्फ प्रवीण कालोकर आणि नाझीर अंसारी यांच्या मदतीने सुमारे १ लाखाची सुपारी देऊन पतीच्या हत्येचा कट रचला.
अशी केली हत्या
२९ एप्रिल रोजी दीपमालाने आपल्या पतीला दिघोरी येथील एका नातेवाईकाच्या लग्न समारंभासाठी बोलावलं. दुसऱ्या दिवशी ३० एप्रिल रोजी आरोपी सोनू कालोकर आणि नाझीर अंसारी कार घेऊन पोहोचले. दीपमालाने आपल्या पतीला कारमध्ये बसवून आरोपींच्या ताब्यात दिले. आरोपींनी त्यांना घोडपेठच्या निर्जन भागात नेले आणि कारमध्येच गळा आवळून त्यांची हत्या केली.
सरकारी नोकरीसाठी घेतला जीव
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ मे रोजी आरोपींनी दीपमालाला फोन करून 'काम झालं' अशी माहिती दिली होती. तपासात असंही समोर आलं आहे की, पती-पत्नी अनेक वर्षांपासून वेगळे राहत होते. पतीच्या निधनानंतर अनुकंपा तत्त्वावर आपल्याला सरकारी नोकरी मिळेल, या हेतूने पत्नीने हे क्रूर पाऊल उचलले. पोलिसांनी ३ मे रोजी दीपमाला कुलमेथे आणि वर्षा परचाके यांना वरोरा येथून अटक केली, तर सोनू उर्फ प्रवीण कालोकर आणि नाझीर अंसारी यांना ४ मे रोजी पहाटे नागपूरमधून ताब्यात घेतले. आरोपींकडून हत्येसाठी वापरलेली कार आणि मोबाईल जप्त करण्यात आला आहे.