मुंबई विमानतळावर ७ मे रोजी ६ तासांचा 'ब्लॉक'; धावपट्टीच्या देखभालीसाठी विमान सेवा राहणार बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 12:03 IST2026-05-06T11:59:52+5:302026-05-06T12:03:28+5:30
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (CSMIA) प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे.

मुंबई विमानतळावर ७ मे रोजी ६ तासांचा 'ब्लॉक'; धावपट्टीच्या देखभालीसाठी विमान सेवा राहणार बंद
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (CSMIA) प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. गुरुवारी, ७ मे रोजी विमानतळावरील दोन्ही धावपट्ट्या (Runways) दुरुस्ती आणि देखभालीच्या कामासाठी ६ तासांकरिता बंद ठेवण्यात येणार आहेत. या काळात विमानतळावरील सर्व विमान ऑपरेशन्स पूर्णपणे स्थगित राहतील.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी ११:०० वाजल्यापासून ते संध्याकाळी ५:०० वाजेपर्यंत धावपट्टीच्या देखभालीचे काम चालणार आहे. पावसाळापूर्व देखभालीच्या कामाचा भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई विमानतळावर 'RWY 09/27' आणि 'RWY 14/32' अशा दोन धावपट्ट्या आहेत, या दोन्ही या सहा तासांच्या कालावधीत वापरासाठी उपलब्ध नसतील.
दरवर्षी पावसाळ्यापूर्वी मुंबई विमानतळावर अशा प्रकारे धावपट्टीची तांत्रिक तपासणी आणि दुरुस्ती केली जाते. पावसाळ्यात धावपट्टीवर पाणी साचू नये, विमानांचे लँडिंग सुरक्षित व्हावे आणि तांत्रिक बिघाड टाळता यावा, या उद्देशाने हे 'मान्सून मेंटेनन्स' केले जाते. यामध्ये धावपट्टीवरील दिवे, गटारांची सफाई आणि धावपट्टीच्या पृष्ठभागाची दुरुस्ती यांसारखी महत्त्वाची कामे केली जातात.
प्रवाशांना सूचना
विमानतळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या नियोजित कामाची माहिती एअरलाईन्स आणि संबंधित विभागांना खूप आधीच देण्यात आली होती. जेणेकरून प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी विमान कंपन्यांना त्यांच्या फ्लाईट्सचे वेळापत्रक आधीच बदलता येईल.
विमान कंपन्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन
ज्या प्रवाशांनी ७ मे रोजी प्रवासाचे नियोजन केले आहे, त्यांनी आपल्या फ्लाईटची स्थिती जाणून घेण्यासाठी संबंधित विमान कंपनीशी संपर्क साधावा किंवा एअरलाईनच्या वेबसाइटला भेट द्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे. संध्याकाळी ५ वाजेनंतर विमानतळावरील कामकाज पुन्हा पूर्ववत होणार आहे.