विजय यांच्या टीव्हीकेला पाठिंबा द्या, अन्यथा..., ३० आमदारांचा इशारा, तामिळनाडूत अण्णा द्रमुक फुटीच्या उंबरठ्यावर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 12:30 IST2026-05-06T12:26:33+5:302026-05-06T12:30:09+5:30
Tamilnadu Assembly Election 2026 Result : बहुमतासाठी १० जागा कमी पडल्याने मॅजिक फिगर गाठण्यासाठी विजय याचा पक्ष कुणाला सोबत घेणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे विजयच्या पक्षाला पाठिंबा देण्यावरून अण्णा द्रमुक पक्षात उभी फूट पडण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.

विजय यांच्या टीव्हीकेला पाठिंबा द्या, अन्यथा..., ३० आमदारांचा इशारा, तामिळनाडूत अण्णा द्रमुक फुटीच्या उंबरठ्यावर?
नुकत्याच झालेल्या तामिळनाडू विधानसभेच्या निवडणुकीत अभिनेता विजय याच्या टीव्हीके पक्षाने सनसनाटी विजय मिळवला आहे. विधानसभेतील २३४ पैकी १०८ जागा जिंकत विजय याचा पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. सोबतच विजयच्या पक्षाने द्रमुक आणि अण्णा द्रमुक या द्रविड अस्मितेचं राजकारण करणाऱ्या प्रस्थापित पक्षांना मोठा धक्का दिला आहे. मात्र बहुमतासाठी १० जागा कमी पडल्याने मॅजिक फिगर गाठण्यासाठी विजय याचा पक्ष कुणाला सोबत घेणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे विजयच्या पक्षाला पाठिंबा देण्यावरून अण्णा द्रमुक पक्षात उभी फूट पडण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.
विधानसभा निवडणुकीत अभिनेता जोसेफ विजय याच्या पक्षाने अनपेक्षित मुसंडी मारत १०८ जागा जिंकल्या होत्या. तर अण्णा द्रमुकला केवळ ४७ जागांवर समाधान मानावे लागले होते. दरम्यान, बहुमतापासून १० जागांनी दूर असलेल्या विजयला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसने हालचाली सुरू केल्या होत्या. तर दुसरीकडे अण्णा द्रमुक पक्षातील एक गटही विजयच्या पक्षाला पाठिंबा देण्यास उत्सुक असून, विजयच्या पक्षाला पाठिंबा द्या अन्यथा पक्षातून बाहेर पडू असा इशारा अण्णा द्रमुक मधील सुमारे ३० आमदारांच्या गटाने दिला आहे. विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर घडत असलेल्या या घडामोडींमुळे अण्णा द्रमुक पक्षात फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दुसरीकडे पक्षातील संभाव्य फूट टाळण्यासाठी आणि काँग्रेसला तामिळनाडूमधील सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी संपूर्ण अण्णा द्रमुक पक्षच विजयच्या ट्वीव्हीके पक्षाला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्याच्या विचारात असल्याचे सांगण्यात येत आहे.