कोकणात उद्धवसेनेला आणखी एक धक्का बसणार, सनसनाटी विजय मिळवणारा नेता शिंदेसेनेच्या वाटेवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 12:01 IST2026-05-06T12:00:48+5:302026-05-06T12:01:27+5:30
Sandesh Parkar News: २०२४ मध्ये झालेली आणि नुकत्याच आटोपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवामुळे जबर पिछेहाट झालेल्या उद्धवसेनेला लागलेली गळती थांबण्याचे नाव घेत नाही आहे. आता कोकणात उद्धवसेनेला आणखी एक धक्का बसणार असल्याची माहिती समोर येत आहे.

कोकणात उद्धवसेनेला आणखी एक धक्का बसणार, सनसनाटी विजय मिळवणारा नेता शिंदेसेनेच्या वाटेवर
२०२४ मध्ये झालेली आणि नुकत्याच आटोपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवामुळे जबर पिछेहाट झालेल्या उद्धवसेनेला लागलेली गळती थांबण्याचे नाव घेत नाही आहे. आता कोकणात उद्धवसेनेला आणखी एक धक्का बसणार असल्याची माहिती समोर येत आहे. उद्धवसेनेचे नेते आणि कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष संदेश पारकर हे शिंदेसेनेच्या वाटेवर असल्याचे सांगण्यात येत आहे.
शिंदेसेनेतील संभाव्य प्रवेशाबाबत स्पष्ट संकेत देताना संदेश पारकर यांनी सांगितले की, राजकारणात राहून जर आपल्याला शहराचा विकास करायचा असेल, योग्य पद्धतीने काम करायचे असेल, तर त्यासाठी काहीतरी निर्णय हा घ्यावाच लागणार आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांशी चर्चा करून, ज्या नेत्यांनी मला घडवलं, ज्यांनी मदत केली, त्यांच्याशी चर्चा करून याबाबतचा निर्णय घेण्याचा माझा प्रयत्न आहे. मात्र हा निर्णय कधी होईल, हे काही मला आज सांगता येणार नाही. पण हा निर्णय शहराच्या विकासासाठी तसेच जिल्ह्याच्या विकासासाठी घ्यावा लागेल, असे संदेश पारकर यांनी सांगितले.
गतवर्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत संदेश पारकर यांनी कणकवली नगरपंचायतीमध्ये स्थानिक आघाडीचे उमेदवार म्हणून भाजपासमोर आव्हान उभं केलं होतं. त्यांना शिंदेसेनेचे आमदार निलेश राणे यांनी पाठिंबा दिला होता. अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत संदेश पारकर यांनी सनसनाटी विजय मिळवला होता. संदेश पारकर यांना मिळालेला विजय हा भाजपाचे मंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांना मोठा धक्का मानले जात होते. मात्र हा निकाल लागल्यापासूनच संदेश पारकर हे शिंदेसेनेत जाणार असल्याची कुजबूज सुरू झाली होती.