Loan Waiver RBI Fraud: तुमच्याकडेही असा एखादा कॉल किंवा मेसेज आला आहे का, ज्यामध्ये तुमचz कर्ज माफ करण्याबाबत सांगण्यात आलंय? अशा प्रकरणांवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) सर्वसामान्यांना एक मोठं आवाहन केलंय. कर्जमाफीचे खोटे आश्वासन देणाऱ्या जाहिरातींपासून सावध राहण्याचा सतर्कतेचा इशारा आरबीआयनं दिलाय. लोक अशा फसवणुकीला बळी पडू नयेत, यासाठी रिझर्व्ह बँकेनं विविध मीडिया चॅनेल आणि थेट संपर्काद्वारे जनजागृती मोहीम सुरू केली आहे.
अनेक जाहिरातींमध्ये बँका आणि NBFC कडील थकीत कर्ज माफ करण्याचे खोटे आश्वासन दिलं जातंय. हे ठग कर्जमाफीचे प्रमाणपत्र (Loan Waiver Certificate) किंवा इतर बनावट कागदपत्रांच्या आधारे लोकांना जाळ्यात ओढतात. त्याबदल्यात 'सर्व्हिस चार्ज' किंवा 'कायदेशीर फी'च्या नावाखाली लोकांकडून पैसे वसूल केले जातात. आरबीआयनं स्पष्ट केलंय की, अशा दाव्यांमुळे दिशाभूल होण्याची गरज नाही; अशा संस्थांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल.
ठग तुम्हाला जाळ्यात कसे ओढतात?
फसवणूक करणाऱ्या संस्था लोकांना असं भासवतात की, त्यांच्याकडे बँकेकडून कर्ज माफ करून घेण्याचा विशेष मार्ग आहे. काही सोप्या स्टेप्स फॉलो करून तुमचे संपूर्ण कर्ज संपवता येईल, असा विश्वास ते देतात. परंतु, जसं लोक त्यांच्या जाळ्यात अडकून फी भरतात आणि कर्जाचे हप्ते भरणे बंद करतात, तसं बँकेच्या नजरेत ते ‘डिफॉल्टर’ बनतात. यामुळे ग्राहकांचं मोठं आर्थिक नुकसान होतं आणि त्यांची क्रेडिट हिस्ट्री खराब होते.
कसं सुरक्षित राहावं?
स्वतःची फसवणूक टाळण्यासाठी काही गोष्टींचं पालन करणं आवश्यक आहे. कोणत्याही कर्जमाफीच्या किंवा विशेष ऑफरची माहिती थेट तुमच्या बँकेकडूनच मिळवा. यासाठी बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या किंवा जवळच्या शाखेत जाऊन चौकशी करा. लक्षात ठेवा, कोणतीही अधिकृत बँक किंवा वित्तीय संस्था कर्जमाफीच्या नावाखाली कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीमार्फत आधी फी मागत नाही. १००% कर्जमाफीसारख्या 'पक्क्या आश्वासनांवर' विश्वास ठेवू नका, कारण हे सहसा फसवणुकीचे संकेत असतात. जे लोक स्वतःला बँक किंवा आरबीआयचे एजंट सांगतात, त्यांची ओळख निश्चितपणे तपासा. आपली वैयक्तिक किंवा आर्थिक माहिती अनोळखी व्यक्तीशी शेअर करू नका. नेहमी केवळ RBI, SEBI, वित्त मंत्रालय किंवा तुमच्या बँकेच्या अधिकृत स्रोतांकडून मिळालेल्या माहितीवरच विश्वास ठेवा.
RBI चा कठोर इशारा
रिझर्व्ह बँकेनं म्हटलंय की, अशा चुकीच्या हालचालींमुळे बँकांच्या विश्वासार्हतेवर वाईट परिणाम होतो. तसेच, जे लोक आपले पैसे बँकेत सुरक्षित ठेवण्यासाठी जमा करतात, त्यांचंही यामुळे नुकसान होतं. अशा फसवणुकीत अडकणाऱ्या लोकांना थेट आर्थिक फटका बसू शकतो. आरबीआयनं म्हटलंय की, अशा दिशाभूल करणाऱ्या कामात गुंतलेल्या कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेपासून दूर राहा. त्यांच्या सेवा घेणे टाळा आणि असा कोणताही प्रकार आढळल्यास त्वरित पोलीस किंवा संबंधित यंत्रणांना याची माहिती द्या.
