५० कोटींचं घबाड! निवृत्त अधिकाऱ्याच्या घरावर ACB चा छापा; २.५ किलो सोनं, २० किलो चांदी अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 11:14 IST2026-02-06T11:13:07+5:302026-02-06T11:14:14+5:30
सेवानिवृत्त सुपरिंटेंडिंग इंजिनिअर कल्लेपल्ली श्रीनिवासा राव यांच्याकडे तब्बल ५० कोटी रुपयांहून अधिक बेहिशोबी मालमत्ता असल्याचं समोर आलं आहे.

फोटो - ndtv.in
आंध्र प्रदेशच्यालाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) एक मोठी कारवाई केली आहे. पंचायत राज विभागाचे सेवानिवृत्त सुपरिंटेंडिंग इंजिनिअर कल्लेपल्ली श्रीनिवासा राव यांच्याकडे तब्बल ५० कोटी रुपयांहून अधिक बेहिशोबी मालमत्ता असल्याचं समोर आलं आहे. राव हे १९९० पासून विभागात कार्यरत होते आणि ३१ डिसेंबर २०२५ रोजी विशाखापट्टणम येथून सेवानिवृत्त झाले होते.
मिळालेल्या माहितीच्या आधारे, ACB ने विशाखापट्टणम, सालुरू आणि हैदराबादमधील राव, त्यांचे कुटुंबीय आणि निकटवर्तीयांच्या विविध ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकले. प्राथमिक तपासणीत त्यांची मालमत्ता उत्पन्नाच्या सोर्सपेक्षा कितीतरी पटीने जास्त असल्याचं दिसून आलं आहे.
छाप्यामध्ये काय सापडलं?
छाप्यामध्ये ACB अधिकार्यांनी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम, सोनं, चांदी आणि जमिनीची कागदपत्रं जप्त केली आहेत. जप्त केलेल्या गोष्टी खालीलप्रमाणे आहेत...
रोख रक्कम - ६१.८७ लाख.
दागिने - २.५ किलो सोनं आणि २०.३ किलो चांदी.
स्थावर मालमत्ता - ३ हाउस प्लॉट्स आणि २ निवासी फ्लॅट.
शेती - सालुरू येथे राव यांच्या मुलीच्या नावावर असलेली १८.५७ सेंट शेतजमीन.
बँक लॉकर - ५ बँक लॉकर्स सील करण्यात आले असून त्यांची तपासणी अद्याप बाकी आहे.
याव्यतिरिक्त अनेक महत्त्वाची कागदपत्रं आणि आक्षेपार्ह साहित्यही जप्त करण्यात आले आहे.
कायदेशीर कारवाईची तयारी
ACB ने श्रीनिवासा राव यांच्याविरोधात 'भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्या'अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राव यांना अटक करून विशाखापट्टणम येथील विशेष ACB न्यायालयात हजर केलं जाणार आहे. बँक लॉकर्स उघडल्यानंतर या मालमत्तेचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.