रबीचा हंगाम मातीमोल झाला, मराठवाड्यात ९० दिवसांत २१७ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 17:00 IST2026-04-21T16:57:27+5:302026-04-21T17:00:01+5:30
कर्ज अन् निसर्गाचा लहरीपणा : गेल्या वर्षी १,१२९ बळी, यंदा तीन महिन्यातच २१७ पार

रबीचा हंगाम मातीमोल झाला, मराठवाड्यात ९० दिवसांत २१७ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात मागील तीन महिन्यांत २१७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
गेल्या महिन्यांत अवकाळी पावसासह झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. हाताशी आलेल्या गव्हाचे पीक अवकाळीमुळे भुईसपाट झाले. कर्जबाजारी होऊन पेरणी केलेल्या शेतकऱ्यांचे या अस्मानी संकटामुळे कंबरडे मोडले. रबी हंगामातील नगदी पीक म्हणून गहू पिकाकडे पाहिले जाते. शेतकऱ्यांचा तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिसकावला. परिणामी, हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या तीन महिन्यांत विभागात २१७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यात मार्च महिन्यात सर्वाधिक ८२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
जानेवारी महिन्यात ७६ तर फेब्रुवारी महिन्यात ५९ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली.
१६१ प्रकरणांत चौकशी सुरू आहे, तर ४४ प्रकरणात मदतीची रक्कम अदा करण्यात आली आहे. ९ प्रकरणे अपात्र ठरली आहेत. ३ प्रकरणे पात्र ठरली असून, त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांपर्यंत अद्याप मदत पोहोचलेली नाही.
गेल्या वर्षी १,१२९ आत्महत्या...
गेल्या वर्षी १,१२९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यातील ७९६ शेतकरी कुटुंबांना मदत करण्यात आली. १४० प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली. १९३ प्रकरणे निर्णयाअभावी प्रलंबित आहेत. ७ कोटी १० लाखांची मदत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनाने केल्याचे आयुक्तालयाच्या अहवालात नमूद आहे.
जिल्हा..........आत्महत्या
छत्रपती संभाजीनगर : ५३
जालना : १३
परभणी : १९
हिंगोली : १३
नांदेड : २९
बीड : ४९
लातूर : ११
धाराशिव : ३०
एकूण : २१७