छत्रपती संभाजीनगर जिल्हा ठरतोय सिकलसेलचा ‘हॉटस्पॉट’; तब्बल ९९ रुग्ण, ७०६ वाहक सक्रिय
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 18:34 IST2026-05-05T18:34:57+5:302026-05-05T18:34:57+5:30
५० लाखांच्या निधीने सिकलसेल मोहिमेला 'बूस्ट'; ७ लाख नागरिकांची तपासणी पूर्ण; सिल्लोड आणि कन्नडमध्ये रुग्णसंख्या सर्वाधिक.

छत्रपती संभाजीनगर जिल्हा ठरतोय सिकलसेलचा ‘हॉटस्पॉट’; तब्बल ९९ रुग्ण, ७०६ वाहक सक्रिय
- विजय सरवदे
छत्रपती संभाजीनगर : सिकलसेल तपासणी किट खरेदीसाठी केवळ जिल्ह्याला मिळालेला ५० लाखांचा निधी फलदायी ठरला. या निधीतून खरेदी केलेल्या किटद्वारे नागरिकांच्या रक्ताची तपासणी केली असता, तब्बल ४२ नवे रुग्ण आणि १८३ नवे वाहक आढळले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ९९ रुग्ण आणि ७०६ वाहक सक्रिय असल्याचे निदान झाले असून, सिकलसेल विरोधातील लढ्यात आरोग्य यंत्रणेला यश मिळाले आहे.
जिल्ह्यात १५ जानेवारीपासून ७ फेब्रुवारीदरम्यान जिल्हा आरोग्य विभागाने संशयित नागरिकांची रक्त तपासणी करण्याची ‘अरुणोदय सिकलसेल ॲनिमिया’ मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेला १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ मिळाली. त्यानंतर आरोग्य विभागाने जिल्ह्यातील ५.५० लाख नागरिकांची तपासणी पूर्ण होईपर्यंत मोहीम सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. परंतु, रक्त तपासणीसाठी आवश्यक किट नसल्यामुळे आरोग्य विभागाने शासनाकडे ५० लाखांच्या निधीची मागणी केल्यानंतर तो मिळाला. त्या निधीतून तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना गरजेनुसार किट खरेदीच्या सूचना दिल्या. त्या किटद्वारे ४ लाख ६० हजार रक्त तपासण्या केल्या. निधी प्राप्त होण्यापूर्वी २.५ लाख नागरिकांची तपासणी झाली होती. १५ जानेवारीपासून सुरू झालेल्या मोहिमेत तेव्हा ५ नवीन रुग्ण व ३२ वाहक आढळले होते. तर ही मोहीम सुरू होण्यापूर्वी जिल्ह्यात ५२ रुग्ण आणि ४९१ वाहक होते. असे एकूण ५७ रुग्ण व ५२३ वाहक आढळून आले होते.
आदिवासीबहुल भागात रुग्णसंख्या
प्रामुख्याने आदिवासीबहुल भागात रुग्ण, वाहक संख्या मोठी आहे. यात सिल्लोडमध्ये वाहक १६९, रुग्ण ३०, कन्नडमध्ये वाहक २२८, रुग्ण २५, सोयगावमध्ये वाहक ९६, रुग्ण १२, संभाजीनगरमध्ये वाहक ४९, रुग्ण १३, खुलताबादेत वाहक १५, रुग्ण ३, फुलंब्रीत वाहक २५, रुग्ण ०१, गंगापूरमध्ये वाहक ०९, रुग्ण ०७, पैठणमध्ये वाहक ५२, रुग्ण ०३, वैजापूरमध्ये वाहक ६३, रुग्ण ५ आहेत.
५० लाखांचा निधी फलद्रुप ठरला
प्रारंभी या मोहिमेला किटअभावाचा फटका बसला; मात्र शासनाकडून ५० लाखांचा निधी मंजूर होताच मोहिमेला नवसंजीवनी मिळाली. तालुकास्तरावर किट खरेदीला वेग आल्याने तपासण्यांचा आकडा वाढला. या निधीतून खरेदी केलेल्या किटद्वारे ४ लाख ६० हजार नागरिकांच्या रक्त तपासण्या झाल्या. आता प्रत्येक ‘पीएचसी’कडे १०-१५ किट शिल्लक आहेत.
- डॉ. अभय धानोकर, जिल्हा आरोग्य अधिकारी