'ही' अट पूर्ण केल्याशिवाय नाही मिळणार शेतकऱ्यांना कर्जमाफी; नियमित कर्जदारांना ५० हजारांचे प्रोत्साहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 19:05 IST2026-05-07T19:01:34+5:302026-05-07T19:05:47+5:30
Chandrapur : बळीराजाला कर्जाच्या विळख्यातून मुक्त करून त्याला पुन्हा एकदा सन्मानाने शेती करण्यासाठी बळ देणाऱ्या राज्य सरकारच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजने'ने आता गती घेतली आहे.

Farmers will not get loan waiver unless 'this' condition is fulfilled; Rs 50,000 incentive for regular borrowers
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : बळीराजाला कर्जाच्या विळख्यातून मुक्त करून त्याला पुन्हा एकदा सन्मानाने शेती करण्यासाठी बळ देणाऱ्या राज्य सरकारच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजने'ने आता गती घेतली आहे.
गेल्या काही वर्षातील नैसर्गिक संकटांच्या मालिकांमुळे खचलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही योजना एक 'संजीवनी' ठरणार आहे. मात्र, या योजनेचा लाभ थेट बैंक खात्यात मिळवण्यासाठी सरकारने आधार प्रमाणीकरण ही अट अनिवार्य केली आहे. ही तांत्रिक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच कर्जमाफीच्या लाभाचा मार्ग मोकळा होणार असल्याने, जिल्ह्यातील दीड लाख शेतकऱ्यांच्या नजरा आता आधार केंद्रांकडे लागल्या आहेत. पारदर्शकता आणि अचूकता राखण्यासाठी उचललेले हे पाऊल शेतकऱ्यांसाठी अंतिम टप्प्यातील महत्त्वाची पायरी ठरणार आहे.
कसे करायचे आधार प्रमाणीकरण?
शेतकऱ्यांनी जवळच्या सीएससी (सीएससी) केंद्रावर किंवा बँकेत जावे, आपल्या अंगठ्याचा ठसा देऊन माहितीची खातरजमा करावी, माहिती जुळल्यास पोर्टलवर 'सक्सेस' असा संदेश येईल. काही त्रुटी असल्यास आधार केंद्रावर जाऊन दुरुस्ती करून घ्यावी.
अॅग्रीस्टॅकवर नोंदणी केली का?
'अॅग्रीस्टॅक' पोर्टलवर नोंदणी असलेल्या शेतकऱ्यांना पीक पाहणी, कर्ज आणि विमा यांसारख्या सेवा भविष्यात पेपरलेस पद्धतीने मिळणे सुलभ होईल.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना
राज्यातील महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी ही महत्त्वपूर्ण योजना जाहीर केली आहे. थकीत कर्जदारांना कर्जमुक्त करणे आणि नियमित कर्ज भरणाऱ्यांना प्रोत्साहन देणे, असा दुहेरी उद्देश या योजनेचा आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने सुरू झालेली ही योजना ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा देणारी ठरेल.
आधार प्रमाणीकरण अनिवार्य
केवळ अर्ज करून चालणार नाही, तर प्रत्येक पात्र शेतकऱ्याला आपले आधार प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे. ज्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले आहे, त्यांनाच ही प्रक्रिया पूर्ण करता येईल. प्रमाणीकरण न झाल्यास लाभ मिळण्यास तांत्रिक अडचण येऊ शकते.
शेतकऱ्यांना मिळणार असा लाभ
थकीत कर्जदार : ज्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज थकीत झाले आहे, त्यांना २ लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी थेट दिली जाणार आहे.
नियमित कर्जदार : जे शेतकरी प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करतात, त्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देऊन शासनाकडून गौरविण्यात येणार आहे.
७९ हजार शेतकऱ्यांकडे ८१४ कोटींचे कर्ज थकीत
चंद्रपूर जिल्ह्यात सहकारी आणि राष्ट्रीयीकृत बँकांच्या माध्यमातून कर्ज घेतलेल्या सुमारे ७८ हजार ९५८ शेतकऱ्यांकडे ८१३ कोटी ८४ लाख रुपये थकीत आहेत. तर ७१ हजार ८१० नियमित शेतकऱ्यांची माहिती डीडीआरने भरली आहे.
कर्जमाफीसाठी निकष आणि अटी-शर्ती
योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य आहे. शासकीय कर्मचारी आणि प्राप्तिकर भरणारे शेतकरी या योजनेसाठी पात्र नसतील. एका आधार क्रमांकावर केवळ एकदाच (पती किंवा पत्नीपैकी एकाला) लाभ मिळेल, कर्ज मर्यादा २ लाख रुपयांच्या आत असणे आवश्यक आहे.
"आधार प्रमाणीकरणाबाबत अद्याप काही आले नाही. मात्र कर्जदाराबाबत मागितलेल्या नियमित व थकबाकीदारांची माहिती भरण्याचे काम सुरू आहे."
- जे. के. ठाकूर, जिल्हा उपनिबंधक