वाल्मीक कराडला पोटदुखीचा त्रास; तपासणीत 'सिस्टायटिस'चे निदान, काय आहे 'हा' आजार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 19:22 IST2026-04-18T19:20:16+5:302026-04-18T19:22:07+5:30
बदललेलं रूप अन् अनवाणी पाय! तगड्या बंदोबस्तात तपासणी करून पुन्हा कारागृहात रवानगी

वाल्मीक कराडला पोटदुखीचा त्रास; तपासणीत 'सिस्टायटिस'चे निदान, काय आहे 'हा' आजार?
बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड याला शुक्रवारी दुपारी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पोटदुखी आणि तापाचा त्रास होत असल्याने जिल्हा कारागृहातील डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर त्याला येथे आणण्यात आले. मात्र, तपासणीनंतर प्रकृती धोक्यात नसल्याचे स्पष्ट झाल्याने औषधोपचार देऊन त्याची पुन्हा कारागृहात रवानगी करण्यात आली.
वाल्मीक कराड याला ११ आणि १५ एप्रिल रोजी कारागृहातच प्राथमिक उपचार देण्यात आले होते. मात्र, प्रकृतीत सुधारणा न झाल्याने शुक्रवारी जिल्हा रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांना पाचारण करण्यात आले. सर्जन आणि फिजिशियन यांनी तपासणी केल्यानंतर त्याचे सीटीस्कॅन, सोनोग्राफी आणि रक्ताच्या विविध चाचण्या करण्यात आल्या. सोनोग्राफी आणि सीटीस्कॅनमध्ये 'सिस्टायटिस' (मूत्राशयातील बदल) जाणवले, तर रक्ताच्या अहवालातही काही किरकोळ बदल दिसून आले. हे सर्व आजार औषधांनी बरे होण्यासारखे असल्याने डॉक्टरांनी त्याला ॲडमिट न करता पुन्हा कारागृहात पाठवले.
बदलेले रूप अन् कडक बंदोबस्त
रुग्णालयात आणले तेव्हा वाल्मीक कराडच्या रूपात मोठा बदल जाणवला. वाढलेले आणि पूर्ण पांढरे झालेले केस, हातात बांधलेले भगवे दोरे-गंडे आणि पायात चप्पल नसलेल्या अवस्थेत तो दिसला. रुग्णालयातील तपासण्यांदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला होता. उपचार आणि तपासण्या पूर्ण होईपर्यंत जिल्हा रुग्णालय परिसरात पोलिसांचा मोठा राबता होता.
'सिस्टायटिस' म्हणजे काय?
सिस्टायटिस म्हणजे मूत्राशयाची सूज. हे सहसा जिवाणू संसर्गामुळे होते. मूत्राशयाच्या अस्तराला सूज आल्याने लघवी करताना जळजळ आणि वेदना होतात. वेळेवर उपचार न केल्यास हा संसर्ग मूत्रपिंडापर्यंत पोहोचू शकतो.
प्रमुख लक्षणे काय?
१. लघवी करताना तीव्र जळजळ किंवा वेदना होणे.
२. वारंवार लघवीला जावे लागणे; पण प्रमाण कमी असणे.
३. लघवीचा रंग गढूळ होणे किंवा दुर्गंधी येणे.
४. ओटीपोटात सतत दुखणे किंवा ताण जाणवणे.
'सिस्टायटिस'चे निदान
तपासण्या केल्या असता 'सिस्टायटिस' असल्याचे निदान झाले; परंतु औषधोपचारावर हा आजार बरा होणार असल्याने ॲडमिट केले नाही.
-डॉ. नागेश चव्हाण, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, बीड