Beed Crime: 'कौटुंबिक भांडण ठरले जीवघेणे!'; टिप्पर चालकाचा काठीने मारहाण करून खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 15:44 IST2026-05-06T15:43:38+5:302026-05-06T15:44:31+5:30
ग्रामपंचायत सेवकाने टिप्पर चालकाचा जीव घेतला; भरदुपारी हॉटेलमध्ये घडला खुनाचा प्रकार.

Beed Crime: 'कौटुंबिक भांडण ठरले जीवघेणे!'; टिप्पर चालकाचा काठीने मारहाण करून खून
केज (जि. बीड): केज तालुक्यातील सुर्डी येथील ग्रामपंचायत सेवक मंगेश भरत माने (वय ३२) याने गावातीलच टिप्पर चालक खुशालराम बलभीम ठोंबरे (वय ५५) यांचा काठीने बेदम मारहाण करून खून केला. ही घटना मंगळवारी दुपारी मांगवडगाव शिवारातील सुर्डी फाटा येथील एका हॉटेलमध्ये घडली.
भांडणाची कुरापत अन् जीवघेणा हल्ला
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी त्यांच्या कुटुंबात झालेल्या भांडणाची कुरापत काढून मंगेश माने याने खुशालराम ठोंबरे यांना लाकडी काठीने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाण इतकी भीषण होती की ठोंबरे हे जागीच बेशुद्ध पडले. त्यांना तातडीने धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तेथे पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.
पोलीस कारवाई आणि अंत्यसंस्कार
मयत खुशालराम ठोंबरे यांचा मुलगा बालाजी ठोंबरे याने दिलेल्या फिर्यादीवरून युसूफवडगाव पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री आरोपी मंगेश माने विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी दुपारी सुर्डी येथे मयतावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिन्द्रनाथ शेंडगे यांनी या प्रकरणाचा पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.