"पेट्रोलसाठीची धावपळ ठरली जीवघेणी!"; टँकर-दुचाकीच्या भीषण अपघातात तरुणाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 13:15 IST2026-05-05T13:14:51+5:302026-05-05T13:15:38+5:30
पेट्रोल आणण्यासाठी गेलेल्या औरंगपूरच्या तरुणाचा टँकरच्या धडकेत मृत्यू; माजी सरपंचांच्या पुत्रावर काळाचा घाला.

"पेट्रोलसाठीची धावपळ ठरली जीवघेणी!"; टँकर-दुचाकीच्या भीषण अपघातात तरुणाचा मृत्यू
केज (जि. बीड): तालुक्यातील औरंगपूर येथील विवेक सुधीर रानमारे (वय २७ वर्षे) या तरुणाचा दुचाकीसाठी पेट्रोल आणायला गेलेला असताना अपघात होऊन मृत्यू झाला. रविवारी (दि. ३ मे) रात्री ११ वाजेच्या सुमारास आंबा साखर कारखाना परिसरातील पेट्रोल पंपावरून परतत असताना टँकर आणि दुचाकीमध्ये हा भीषण अपघात झाला.
इंधन तुटवड्याची लागली झळ
बीड जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. आंबा साखर कारखाना परिसरातील पंपावर पेट्रोल विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर विवेक तेथे गेला होता. पेट्रोल भरून गावी परतत असताना समोरून येणाऱ्या टँकरने त्याच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात तो गंभीर जखमी झाला होता.
उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली
गंभीर जखमी झालेल्या विवेकला तात्काळ स्वराती रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र सोमवारी सकाळी उपचारादरम्यान त्याचे निधन झाले. घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून अपघातग्रस्त टँकर ताब्यात घेतला आहे. विवेक हा माजी सरपंच व सामाजिक कार्यकर्ते सुधीर रानमारे यांचा मुलगा होता. सोमवारी सायंकाळी औरंगपूर येथील शेतात त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.