Traditional things like bindi, sari, when foreigners wear.Try to understand exchange behind this. | बिंदी, साडी यासारख्या पारंपारिक गोष्टी जेव्हा परदेशी लोक घालतात तेव्हा.
बिंदी, साडी यासारख्या पारंपारिक गोष्टी जेव्हा परदेशी लोक घालतात तेव्हा.
<p>-नीरजा पटवर्धन

आज काय खास? इतकं तयार होऊन आलीयेस !’ ठकूच्या कपड्यांकडे बघून सातासमुद्रापारच्या देशात कुणीतरी साडेसहाशेव्यांदा हा प्रश्न ठकूला विचारला. आपल्या मळखाऊ रंगाच्या, पिदडायच्या सलवार कुर्त्याकडे बघून ठकूला प्रश्नकर्त्याबद्दल साडेसहाशेव्यांदा सहानुभूती दाटून आली. सहाशे एकावन्नावी वेळ आलीच नाही. ठकूनं रोजच्या वापरातून सलवार कुर्ते काढूनच टाकले. भारतात परत येताना ते सगळे ठकूनं यमीपेक्षा पाचशेपट गोरी असलेल्या आपल्या मैत्रिणीला देऊन टाकले. मैत्रिणीनं ते कौतुकानं मिरवत वापरले. 

जगामध्ये वेगवेगळ्या काळात, वेगवेगळ्या प्रदेशात अशा मैत्रिणी असतील. आपलं रूप सजवायला वेगळं, नवीन काहीतरी मिळाल्याच्या उत्साहात त्यांनी अशाच एकमेकींच्या वस्तू वापरल्या असतील आणि कदाचित कपड्यांच्या इतिहासाला नवं वळण लागलं असेल. हे आपण पाहिलं. पण हे तेवढंच आहे का? 

जेव्हा एखादी पाश्चिमात्य कन्या टिकल्या लावून एखाद्या वधूसारखं नटते तेव्हा आपल्या मिश्र प्रतिक्रिया असतात. एकतर असा जामानिमा केल्यानंतर त्या आपल्याला माहिती असलेल्या प्रकारे वावरत नाहीत. त्यामुळे ‘कुठून आलं हे येडं !’ असं वाटून आपल्याला हसायला येतं. मग ‘बघा बघा गोर्‍या लोकांनाही आमच्या संस्कृतीचं कौतुक !’ असा प्रखर अभिमान आमच्या हृदयात जागृत होतो. मग हे सगळं करून ती मॅडोना, शकिरा, व्हेनेसा किंवा सेलिना तिच्या नृत्यात मादक हालचाली करते तेव्हा आम्हाला ‘संस्कृतीचा अपमान !’ वगैरे वाटतो. हे अतिशय विनोदी आहे आणि दांभिकही. जे या तारकांनी  केलं तेच बॉलिवूडच्या आयटम सॉँगमध्ये एखाद्या नर्तिकेनं केलं तर मात्र कसलाही अपमान न होता आम्ही मिटक्या मारता बघू शकतो. तिथे कुंकवाचा अडसर येत नाही. 

खरं तर कुंकू हिंदू स्त्नीच्या वैवाहिक स्थिती निदर्शक प्रतीकांपैकी एक असं कैक शतकं  मानलं गेलं आहे. मानसिकता बदलत जाते आहे तसं विधवेनं कुंकू लावणं निषिद्ध आणि सव्वाष्ण बाईनं कुंकू लावलंच पाहिजे वगैरे नियमांचा कट्टरपणा बराचसा कमी झालेला आहे. स्त्रिया समाजामध्ये स्वत:ची ओळख निर्माण करत आहेत. वैवाहिक स्थिती ही प्रदर्शन करायची गोष्ट नसून अतिशय खासगी गोष्ट आहे या कारणानं अनेक स्त्रियांनी तथाकथित सौभाग्यचिन्हं नाकारली आहेत.

कुठल्याही स्वरूपातलं कुंकू हे आता अनेक भारतीय स्त्रिया केवळ चेहरा सजवण्याची वस्तू म्हणूनच वापरायला लागल्या आहेत. आणि या सजावटीसाठी भरपूर प्रकारच्या टिकल्या बाजारात उपलब्ध आहेत. या पार्श्वभूमीवर मॅडोनापासून सेलिना गोमेझपर्यंत सगळ्यांनी टिकल्या वापरणं यात ‘इतका आरडाओरडा का?’ हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. पाश्चिमात्य जगामध्ये विविध संस्कृतींची पार्श्वभूमी असलेले लोक राहातात. तिथे जाऊन मुख्य धारेत समाविष्ट होण्यासाठी त्यांनी आपलं म्हणून बरोबर आणलेलं जे काही आहे त्यातलं बरंच त्यांची इच्छा असो नसो टाकून दिलेलं आहे. जिथे आपण राहातो त्या समाजाचा भाग होण्यासाठी त्यांनी ती किंमत मोजली आहे.

आपली सांस्कृतिक ओळख पटकन डोळ्यावर येणार नाही याबद्दल प्रयत्न केले आहेत. पण ज्या ठळक गोष्टी त्यांचं बाहेरचं असणं अधोरेखित करत होत्या त्याच गोष्टी मुख्यधारेतल्या तारेतारकांनी उजमेखून वापरल्या आहेत. त्या वस्तूंना अनोखेपणाचं लेबल लावून, त्या वस्तूंना मुळातला अर्थ, मुळातलं कारण या कशाचाही संदर्भ लक्षात न घेता वापरल्या आहेत आणि आजही वापरल्या जात आहेत. अनोखेपणा, गूढ आणि म्हणून मादक अशी एक प्रतिमा या वस्तूंच्या द्वारे उभी केली जाते आणि विकली जाते. त्या त्या संस्कृतीची पार्श्वभूमी असलेल्या बहुतेक सगळ्याच लोकांकडे बघायचा दृष्टिकोन या लेबलांमुळे गढूळ झालेला आहे. उदाहरणार्थ वेगळ्या संस्कृतीतली, रंगानं काळीसावळी असलेली, कुंकू किंवा मांगटिका वापरणारी, नेसायचं वस्र वापरणारी स्त्नी ही केवळ एक सुखावणारं, छेडणारं लैंगिक आकर्षण यापुरतीच किंवा रोमानियाच्या भटक्या समाजातले लोक हे जगाचे नियम मोडून जगणारे,                        चो -यामा-या करणारे, शरीरसंबंधाच्या बाबतीत अगदीच धरबंध नसलेले लोक अशी काही समीकरणं बनतात. 

मिश्र समाजात प्रतीकांच्या अस्मिता या फार कडवट, कर्मठ होतात. आणि त्यामुळे मानापमानही टोकाचेच. आपल्या संस्कृतीच्या वस्तू आपण वापरायला बंधन. पण कुणी सेलिना तिच्या गाण्याला ‘आदिम आणि मध्यपूर्वेची डूब’ देण्यासाठी बॉलिवूड आणि टिकल्या वापरते ते स्वीकारलं जातं. हा विरोधाभास विविध संस्कृतीतील लोकांना मुख्य धारेपासून वेगळा काढतो. त्यांना असुरक्षित वाटायला लावू शकतो. या विषयाबद्दल गेल्या काहीच वर्षांमध्ये तपशिलात आणि गांभीर्यानं चर्चा सुरू झाली आहे. एखाद्या संस्कृतीशी जोडलेली चिन्हं, प्रतीकं, वस्तू इत्यादींची देवाणघेवाण होणं हे अपरिहार्य आहेच. काही प्रमाणात स्वागतार्हही आहे.  नक्की किती आणि काय योग्य वा अयोग्य याबद्दल अजून अनेक पातळ्यांवर संभ्रम आहेत. अयोग्य असण्याची ओरड कधी टोकाला जाऊन दोन समूहांमध्ये पक्क्या भिंती घालण्याचं काम करते आहे तर यात काहीच चूक नाही हे विधान टोकाला जाऊन पूर्णपणे असंवेदनशील आणि अनिर्बंध व्यवहाराचं सर्मथन करण्यासाठी उभं ठाकतं आहे. पाश्चिमात्य विश्व हे काही प्रमाणात संपूर्ण जगाची मुख्याधारा म्हणता येईल अशी परिस्थिती आहे. त्यामुळे अर्थातच त्यांचं अंधानुकरण जगभर केलं जातं.

भारतही याला अपवाद नाही. आपणही पाश्चिमात्य जगाच्या पावलावर पाऊल ठेवून इतर संस्कृतींमधील रूपचिन्हांचा, प्रतीकांचा यथेच्छ वापर करतो. हे झालं बाहेरच्या देशांमधल्या संस्कृतींविषयी; पण इथल्या इथे आपल्याच देशातल्या गोष्टींचं आपण काय करतो तेही बघण्यासारखं आहे. इथे प्रांतानुसार, भाषेनुसार इतक्या अनेक संस्कृती नांदतात. प्रत्येकाचे पारंपरिक कपडे आणि त्याबरोबरचे रीतरिवाज वेगळे. स्वातंत्र्यानंतर या सर्व संस्कृती एकत्र नांदाव्या यासाठी तयार केलेले ‘विविधतेत एकता’ हे एक ब्रीदवाक्य. शालेय अभ्यासक्रमामध्ये हे कायमच महत्त्वाचा भाग होते. ती विविधतेतली एकता सिद्ध करण्यासाठी दरवर्षी प्रत्येक शाळेत गॅदरिंगला एक तरी कार्यक्रम असायचाच, ज्यात किमान दहा-पंधरा राज्यांचे कपडे घातलेले विद्यार्थी स्टेजवर येऊन जयहिंद म्हणत असत. आजही हे चालू असतंच शाळांमध्ये आणि इतरही अनेक ठिकाणी. विविधतेत एकता, राष्ट्रीय एकात्मता वगैरे साधण्यासाठी जो वेश केलेला आहे तो तपशिलात योग्य आहे का? अर्थाचा अनर्थ होईल अशा चुका तर नाहीत? वगैरे मुद्दे इथे खिसगणतीतही नसतात.

साचे ठरलेले असतात. मराठी स्त्नी म्हणल्यावर वाईटरीत्या शिवलेली, मोक्याच्या ठिकाणी घट्ट अशी नऊवारी साडी आणि नाकात टीचभर नथ हे यावंच लागतं. बंगाली स्त्रीला पांढ-या आणि लाल साडीशिवाय पर्याय नसतो. मुस्लीम महिलेनं सलवार कुर्ता, डोक्यावरून गुंडाळलेली ओढणी हे घालून हातानं ‘आदाब’ करावंच लागतं. परत आपले राजकीय नेते ज्या ज्या प्रदेशात जातील तिथले शिरस्राण, कपडे घालून लोकांशी समन्वय साधायचा प्रयत्न करत असतात. असा आपल्या संस्कृतीचा नसलेला जामानिमा करून मिरवण्यानंच त्या संस्कृतीचा आदर राखला जातो असं समीकरण आपल्या डोक्यात पक्कं  आहे.  हीच मानसिकता मग इतर वस्तूंच्या वापरातपण येते.

भारतीय समाजाच्या मुख्य धारेच्या काठावर असलेल्या गटांच्या रोजच्या जगण्यातल्या पारंपरिक वस्तू आपण याच मानसिकतेनं वापरतो. विविध कानाकोपर्‍यातल्या आदिवासी जमातींच्या दागिन्यांचा वापर, वारली, मधुबनीसारख्या चित्रशैलींचा कपड्यांमध्ये वापर अशी असंख्य उदाहरणं सांगता येतील. त्या शैलीचा वस्तूंचा मूळ उद्देश बाजूला पडून केवळ त्यातल्या निव्वळ सुंदरतेला धरून त्या वापरल्या जातात.  याबद्दल त्या त्या कलेचे, वस्तूंचं मूळ ज्या समाजगटाकडे आहे त्यांचं म्हणणं काय असू शकतं हा वेगळ्या समाजशास्त्नीय अभ्यासाचा विषय आहे. पण परंपरांचं व्यापारीकरण होतं यात वाद नाही.

अशा पारंपरिक वस्तूंचं, रूपचिन्हांचं व्यापारीकरण टाळण्यासाठी आपण हा वापर थांबवायला हवा असं सांगण्याचा या लेखाचा उद्देश नाही. तसं घडणंही योग्य नाही. या विविध वस्तू, चिन्हं, प्रतीकं, शैली आणि त्यांची तंत्नं हा आपला फार महत्त्वाचा वारसा आहे. या वस्तू पारंपरिकरीत्या घडवणारे कलाकार लोक जगणं, त्यांची कला जगणं, वाढणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. पूर्वी कलाकारांना, कारागिरांना राजार्शय असायचा. तसेच वस्तुविनिमयाची पद्धत होती. त्यामुळे कला जगणं शक्य होतं. या दोन्हीही व्यवस्था आजच्या अर्थकारणात उरलेल्या नाहीत. 

तस्मात कलांचं, कौशल्यांचं जतन व्हायचं असेल, कारागीर, कलाकार जगायचे असतील तर व्यापारीकरण नक्कीच आवश्यक आहे. किती, कसे आणि कुठे हा काही प्रमाणात तारतम्याचा भाग आहे. त्याबद्दल आणि पारंपरिक वस्त्रं , दागिने आणि इतर कलांचं पुनरुज्जीवन आणि व्यापारीकरण याबद्दल पुढच्या वेळेस तपशिलात चर्चा करूया.

(लेखिका वेशभूषाकार असून, या विषयात ‘जॉजिर्या’ विद्यापीठातून त्यांनी मास्टर्स केलेले आहे.) 

needhapa@gmail.com


Web Title: Traditional things like bindi, sari, when foreigners wear.Try to understand exchange behind this.
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.