Heart Attack : बऱ्याच लोकांना शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी कमी वयातच आपलं घर सोडून दुसऱ्या शहरात रहावं लागतं. घर सोडून दुसरीकडे राहणं अनेक दृष्टीने आव्हानात्मक असतं. दुसरीकडे राहणं भावनिकदृष्ट्या तर अवघड असतंच, सोबतच आरोग्यावरही याचा परिणाम होतो. अलिकडेच फिनलँड आणि ब्रिटनच्या वैज्ञानिकांनी दावा केलाय की, कमी वयातच घरापासून दूर राहणाऱ्या लहान मुलांमध्ये किंवा टीनएजर्समध्ये हार्ट अॅटॅक आणि हृदयरोगाचा धोका अधिक वाढतो.
फिनलँड यूनिव्हर्सिटी द्वारे करण्यात आलेला रिसर्च यूरोपिअन जर्नल ऑफ एंडोक्रिनोलॉजीमध्ये प्रकाशित झालाय. या रिसर्चमध्ये आढळून आलंय की, जेव्हा एखादा तरूण किंवा टीनएजर्स घर सोडतो तेव्हा त्याच्या लाइफस्टाईलमध्ये अचानक मोठे बदल येतात. घरातील पौष्टिक आहार बंद होतो आणि त्याजागी जंक फूड, फास्ट फूड किंवा पॅकेज फूड खाल्ले जातात. तर बऱ्याच लोकांना मद्यसेवन किंवा धुम्रपानाची सवय लागते. या बदलामुळए शरीरात फॅटचं प्रमाण अधिक वाढतं. १७ वयात शरीरात फॅट अधिक प्रमाणात जमा होऊ लागतं. जे घातक असतं.
त्याशिवाय एकटे राहण्याचा स्ट्रेस, कमी झोप आणि एक्सरसाईन न करणे या गोष्टींचा प्रभाव धमण्यांवर पडतो. संशोधकांचं मत आहे की, १८ ते १९ वयाच्या लोकांमध्येही हृदयरोगांची सुरूवातीची लक्षणं दिसू लागतात. ज्यामुळे पुढे जाऊन हार्ट फेलिअरचा धोका राहतो.
दुसरीकडे एक्सपर्ट सांगतात की, टीनएजमध्ये हेल्दी लाइफस्टाईल फॉलो करून आणि शरीरातील चरबी कमी करून हृदयरोगांचा धोका टाळता येऊ शकतो. हाच हृदयरोग टाळण्याचा सगळ्यात चांगला काळ असतो.
संशोधकांनी ९ ते २४ वयोगटातील १८०३ मुलांच्या आरोग्याचं विश्लेषण केलं. तेव्हा त्यांना आढळलं की, १७ वयापासूनच शरीरात अतिरिक्त फॅटमुळे हृदयाच्या स्ट्रक्चरमध्ये बदल होतो. ज्यामुळे ब्लड पंप करण्यास हृदयावर अधिक दबाव पडतो. अशात भविष्यात हृदयरोग होण्याचा धोकाही वाढतो.
तणाव आणि एकटेपणा मोठं कारण...
घरापासून दूर राहिल्याने केवळ खाण्या-पिण्यात बिघाड होतो असं नाही तर मानसिक आरोग्यावर देखील मोठा प्रभाव पडतो. कुटुंबातील लोक सोबत नसल्याने तरूणांमध्ये स्ट्रेस हार्मोनचं प्रमाण वाढतं आणि जास्त काळ स्ट्रेस राहिल्याने ब्लड प्रेशर बिघडतं. ब्लड प्रेशरचा थेट संबंध हार्ट अॅटॅकशी असतो. एक्सपर्ट सांगतात की, टीनएज हा काळ शरीराच्या वाढीसाठी नाजूक असतो, जर या काळात लाइफस्टाईल योग्य राहिली नाही तर कोलेस्ट्रेरॉल लेव्हल आणि हाय बीपीसारख्या समस्यांचा धोका वाढतो.
डॉक्टर आणि वैज्ञानिकांचा सल्ला आहे की, नोकरीसाठी किंवा शिक्षणासाठी बाहेर राहत असाल तर आपल्या आहारावर अधिक लक्ष द्या. बाहेरचं खाण्याऐवजी स्वत: जेवण बनवा, डाळी, पालेभाज्या आणि फळं खाण्याला प्राधान्य द्या. दिवसातून कमीत कमी ३० मिनिटे वॉक करा. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे स्ट्रेस जास्त वाढू देऊ नका. घरातील लोकांसोबत नियमितपणे बोला.
